मराठी सिनेविश्वातील नावाजलेलं नाव म्हणजे अतुल परचुरे (atul parchure). नाटक, सिनेमा, मालिका अशा विविधांगी माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले. परंतु, मध्यंतरी सारं काही सुरळीत सुरु असताना त्यांना कर्करोगासारख्या असाध्य आजाराला सामोरं जावं लागलं. अतुल यांना कर्करोग झाला होता. पण, गंभीर आजारावर मात करत अतुल परचुरे यांनी अभिनय क्षेत्रात कमबॅक केलं आहे. नुकतेच झी मराठी नाट्य गौरव सोहळ्यात रंगभूमीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
झी मराठीच्या इन्स्टाग्राम पेजवर झी मराठी नाट्य गौरव पुरस्कार सोहळ्यातल अभिनेते अतुल परचुरे यांचा एक प्रोमो शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये अभिनेते अतुल परचुरे यांचा एक खास परफॉर्मन्स पाहायला मिळत आहे. सोहळ्यात बोलताना ते म्हणाले, 'साधारण वर्षभरापूर्वी मी उभा राहू शकेन की नाही, याची मलाही गॅरंटी नव्हती. मी आज आहे इथे तो केवळ तुमच्यामुळेच'. यावेळी मंचावर उपस्थित सर्वांना 'जिना यहाँ, मरना यहाँ...' हे गाणेदेखील गायलं. संजय मोने, पुष्कर श्रोत्री, मोहन जोशी, भाऊ कदम, वैभव मांगले, चंद्रकांत कुलकर्णी हे कलाकारही मंचावर उपस्थित होते.
काही महिन्यांपूर्वीच अतुल परचुरे यांनी पुन्हा एकदा रंगमंचावर दमदार कमबॅक केलं. 'खरं खरं सांग' या नाटकात ते झळकले. इतकंच नाही तर या नाटकाच्या निमित्ताने त्यांनी विदेशदौरादेखील केला. तर झी मराठी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा येत्या ७ एप्रिल रोजी प्रसारित होणार आहे. नाट्यरसिकांना या सोहळ्याची दरवर्षी प्रतीक्षा असते. या सोहळ्यामध्ये नाट्यविश्वातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली.