Join us

बाहुबलीच्या गायिकेने दिले इंडियन आयडॉल 10 साठी ऑडिशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 11:26 AM

बाहुबलीमध्ये पार्श्वगायन करणार्‍या रम्या बेहरा या हैदराबादच्या गायिकेने इंडियन आयडॉल 10 साठी नुकतेच ऑडिशन दिले. हिंदी चित्रपटसृष्टीतील नवी क्षितिजे धुंडाळण्यासाठी तिला इंडियन आयडॉलच्या मंचाचा उपयोग करायचा आहे.

इंडियन आयडॉलचा प्रतिष्ठित खिताब जिंकणे हे देशभरातील सर्व गायकांचे स्वप्न असते आणि या रिअॅलिटी शोच्या दहाव्या सत्रात खूप गुणी गायक सामील झाले आहेत. दक्षिणेतील सुपरहिट चित्रपट बाहुबलीमध्ये पार्श्वगायन करणार्‍या रम्या बेहरा या हैदराबादच्या गुणी गायिकेने देखील या प्रतिष्ठित खिताबासाठी ऑडिशन दिले होते. रम्याने टॉलीवूडसाठी सुमारे 200 गाणी म्हटली आहेत ज्यात बाहुबली या चित्रपटातील दोन गीतांचा देखील समावेश आहे.रम्याच्या गायनकलेने अनू मलिक, विशाल दादलानी आणि नेहा कक्कड हे तिन्ही परीक्षक खूप प्रभावित झाले होते. तिने या तिन्ही परीक्षकांसमोर आपल्या गायन प्रवासाचे वर्णन केले आणि सांगितले की, तिला वाटते की इंडियन आयडॉल हा गुणी गायकांना संधी देणारा मंच नाही तर नवीन संधी खुल्या करणारा मंच देखील आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील नवी क्षितिजे धुंडाळण्यासाठी तिला इंडियन आयडॉलच्या मंचाचा उपयोग करायचा आहे.रम्या बेहराला याबाबत विचारले असता तिने सांगितले, “मी टॉलीवूडचा एक भाग असल्याने अनेक गाणी म्हटली आहेत आणि येथील संधीचा पूर्ण लाभ घेतला आहे. आता एक गायक म्हणून मला माझी क्षितिजे अधिक रुंदावण्याची आणि हिंदी चित्रपटसृष्टीत छाप उमटवण्याची माझी इच्छा आहे. इंडियन आयडॉल हा एक अद्भुत मंच आहे. या मंचाने अनेक गायकांना आजवर जगभरात ओळख मिळवून दिली आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज परीक्षकांपुढे कला सादर करण्याचा अनुभव खरंच रोमांचक होता. आम्ही खूप मनमोकळ्या गप्पा मारल्या. मला सगळ्याच परीक्षकांनी खूप प्रोत्साहन दिले. इंडियन आयडॉलचे ऑडिशन देता आल्याचा मला आनंद आहे. मला संपूर्ण जगासमोर माझी कला सादर करायची आहे आणि प्रत्येक भाषेत गाणे म्हणण्याचे माझे स्वप्न आहे. मला आशा आहे की, इंडियन आयडॉल माझी स्वप्नं पूर्ण करेल आणि नवीन दिशा माझ्यासाठी खुल्या करेल.दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत रम्या बेहरा हे एक प्रसिद्ध नाव आहे, आता रम्या इंडियन आयडॉलचा किताब मिळवेल का हे पाहाणे रंजक असणार आहे. 

टॅग्स :इंडियन आयडॉल