अविनाश सचदेवला साकारायची आहे महानायक बिग बींची भूमिका !वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 10:43 AM
छोट्या पडद्यावरील आयुष्यमान भवः या मालिकेतून अभिनेता अविनाश सचदेव सध्या रसिकांची मनं जिंकत आहे. छोटी बहू या मालिकेतील देव ...
छोट्या पडद्यावरील आयुष्यमान भवः या मालिकेतून अभिनेता अविनाश सचदेव सध्या रसिकांची मनं जिंकत आहे. छोटी बहू या मालिकेतील देव या भूमिकेनं अविनाश सचदेव प्रसिद्धीच्या झोतात आला. यानंतर त्यानं विविध मालिकांमध्ये लक्षवेधी भूमिकाही साकारल्या आहेत. भविष्यात त्याला बॉलिवूड सिनेमांचं दिग्दर्शनही करण्याची इच्छा आहे. याशिवाय अभिनय कारर्किदीत बिग बींच्या बायोपिक सिनेमात काम करण्याचंही त्याचं स्वप्न आहे. या सगळ्याविषयी अभिनेता अविनाश सचदेव याच्याशी केलेली ही खास बातचीत. तुझ्या अभिनेता म्हणून करियरची सुरुवात कशी झाली? सुरुवातीपासूनच मला फिल्म मेकिंगमध्ये विशेष रस होता. अभिनेता म्हणून कारकिर्दीला सुरुवात करण्याआधी मी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं होतं. हातिम या शोच्या माध्यमातून असिस्टंट डायरेक्टर म्हणून मी माझ्या कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर फिल्म मेकिंगमध्ये आणखी काही तरी वेगळं करावं असा विचार माझ्या मनात डोकावला. त्यामुळेच मी परदेशात जाऊन फिल्म मेकिंगच्या कार्यशाळांना हजेरी लावली. या कार्यशाळांमधून फिल्म मेकिंगच्या बारीकसारीक गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय विविध जाहिरातींमध्ये मॉडेल म्हणूनही काम केलं. जाहिराती करता करता एक दोन मालिकांमध्ये छोट्या छोट्या भूमिकाही साकारल्या. मात्र अभिनेता म्हणून माझ्या करियरची सुरुवात झाली ती छोटी बहू या मालिकेतून. या मालिकेत साकारलेल्या देव या भूमिकेनं मला अभिनेता म्हणून खरी ओळख मिळवून दिली. यानंतर वेगवेगळ्या मालिकांमध्ये विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या.आयुष्यमान भवः काय आहे या मालिकेची कथा कशी आहे जाणून घ्यायला आवडेल? आयुष्यमान भवः ही आठ वर्षीय क्रिश या मुलाची कथा आहे.क्रिशला इतर कोणत्याही मुलाप्रमाणे खेळण्यांसोबत खेळायला आणि मजामस्ती करायला आवडते. त्याचे कुटुंबीय आणि मित्र त्याला खूप जीव लावतात. मात्र त्याच्या आयुष्यात अशी एक घटना घडते की त्याचं जीवनच पालटतं. गत जन्मातील काही विचित्र आणि दुर्दैवी गोष्टी त्याला आठवू लागतात. वर्तमान आणि फ्लॅशबॅक अशा स्वरुपात या मालिकेची कथा पुढे जाते. या मालिकेला मथुरेची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे मालिकेच शूटिंग मथुरेत झाले आहे. कोणतीही भूमिका स्वीकारताना कोणत्या गोष्टींचा विचार करतो आणि या मालिकेतील भूमिका स्वीकारण्यामागे काय खास बात होती ? या मालिकेची कथा आणि माझी भूमिका मला खूप भावली. कोणत्याही मालिकेतील प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळावी आणि त्याच्यावर अधिकाधिक भर आपल्या भूमिकेलाच देण्यात यावा अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. मात्र या मालिकेत माझी प्रमुख भूमिका नसली तरी यांत प्रत्येक भूमिकेचं वेगळेपण आहे. मालिका 8 वर्षीय मुलावर आधारित असली तरी मालिकेतील प्रत्येकाच्या भूमिकाला तेवढंच महत्त्व देण्यात आलं आहे. शिवाय आता छोट्या पडद्यावरील रसिकांची आवड काळानुरुप बदलत चालली आहे. सास-सूनांच्या मालिकांशिवाय रसिकांना इतर वेगळ्या कथा पाहायच्या आहेत हे मला परदेशातील एका कार्यशाळेत जाणवलं. त्यामुळेच वर्षानुवर्षे मालिकांच्या कथेत आणि विषयात बदल येत आहेत. कलाकारानं कोणतंही काम करुन समाधानी होऊ नये. प्रत्येक दिवशी काही ना काही नवं करण्याची त्याची इच्छा असावी असं मला वाटतं. त्यामुळेच आजवर मी साकारलेल्या प्रत्येक भूमिका आधीच्या भूमिकांपासून वेगळ्या होत्या. दरवेळी काही ना काही वेगळं करण्याचा मी प्रयत्न केला आणि हा प्रयत्न रसिकांनाही भावला हे विशेष. या सगळ्या गोष्टी मला आयुष्यमान भवः मालिकेमध्ये पाहायला मिळाल्या म्हणूनच मी या मालिकेत काम करायचं ठरवलं. आयुष्यमान भवः या मालिकेतील भूमिकेसाठी कितपत वेगळी तयारी करावी लागली ? सासू-सूनांवर आधारित विविध मालिकांमध्ये काम केलं. त्यामुळे ही वेगळी मालिका करताना आणि यातील भूमिका साकारण्यासाठी मी बरीच मेहनत घेतली आहे. विशेषतः माझ्या लूक्सवर मी विशेष मेहनत घेतली आहे. मालिका पाहिल्यानंतर तुम्हाला हा बदल जाणवेल. याआधीच्या मालिकांमध्ये मी दाढी ठेवली नसल्याने रसिकांची पसंती मला मिळाली. मात्र या मालिकेत मी दाढी ठेवली आहे. तसंच मी माझं वजनही नऊ किलो कमी केलं आहे. अभिनयाशिवाय तुला आणखी काय करायला आवडेल ? अभिनयाशिवाय भविष्यात मला सिनेमॅटोग्राफी आणि एडिटिंग करायला आवडेल. शिवाय संधी मिळाली तर दिग्दर्शनच्या क्षेत्रातही करियर करायला आवडेल. ज्याला दिग्दर्शनाची माहिती आहे तो उत्तम अभिनेता बनू शकतो किंवा याउलटही होऊ शकते. त्यामुळे भविष्यात मला बॉलीवुड सिनेमांचं दिग्दर्शन करायलाही आवडेल. तुझा ड्रीम रोलविषयी जाणून घ्यायला आवडेल?सध्या विविध व्यक्तींच्या जीवनावरील सिनेमांचा ट्रेंड सुरु आहे. प्रसिद्ध व्यक्तींच्या जीवनावरील सिनेमा रसिकांना भावतायत. त्यामुळे मलाही भविष्यात बायोपिक सिनेमामध्ये काम करायला आवडेल. हिंदी चित्रपटसृष्टीचे शहेनशाह आणि महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांची भूमिका मला साकारायला आवडेल. बिग बी यांच्या जीवनावर सिनेमात काम करण्याची मनापासून इच्छा आहे.