गेल्या काही वर्षांपासून अनेक बॉलीवूडचे अभिनेते टीव्ही मालिका आणि कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ लागल्याचे दिसून येत आहे. आता हिंदी चित्रपटसृष्टीत झळकलेला अभिनेता आयम मेहता स्टार भारत वाहिनीवरील 'कालभैरव रहस्य २' या मालिकेतून छोट्या पडद्याकडे वळला आहे. आयमने पूर्वी 'ए वेन्स्डे', 'झोक्कोमान', 'मद्रास कॅफे' आणि अलीकडे 'पद्मावत' या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका रंगविल्या आहेत. आता तो मालिकेत भूमिका रंगविण्यासाठी खूप उत्सुक आहे.
या मालिकेत आयम हा राजगुरूची भूमिका साकारणार असून तो काळभैरव मंदिराचा पुजारी आहे. एका नव्या टप्प्याचा प्रारंभ करण्यास सिद्ध झालेला आयम या नव्या भूमिकेत अचूक शोभून दिसतो. आपल्या या भूमिकेबद्दल आयमने सांगितले, “टीव्ही असो की चित्रपट, ज्या भूमिकेमुळे अभिनेता उठून दिसतो, नजरेत भरतो, त्यामुळेच त्या व्यक्तिरेखेला महत्त्व प्राप्त होते. 'कालभैरव रहस्य २' मालिकेतील माझी भूमिका रंगविणे हे माझ्यासाठी एक आव्हान आहे, कारण मी अशी भूमिका यापूर्वी कधी रंगविलेली नाही. ही भूमिका इतरांपेक्षा अगदी वेगळी असल्यानेच मी ती स्वीकारली. मला या नव्या अवतारात पाहायला प्रेक्षकांना आवडेल, अशी आशा आहे.” 'कालभैरव रहस्य' मालिकेला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर निर्मात्यांनी दुसरा सीझन बनवण्याचा निर्णय घेतला असून मालिकेतील कलाकारांच्या निवड प्रक्रियेला सुरूवात केली आहे. 'कालभैरव रहस्य'च्या दुसऱ्या सीझनमध्ये मुख्य भूमिकेत गौतम रोडे व अदिती गुप्ता दिसणार आहे. यांच्याव्यतिरिक्त या मालिकेत सिद्धांत कर्णिक, सोनिया सिंग व आयाम मेहता प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ही मालिका एका मंदिरातील रहस्यावर आधारीत असणार आहे आणि यावेळेस मालिकेत बंगला व त्यात राहणारे कुटुंब आणि त्यांच्या जवळच्या मंदिरावर आधारीत असणार आहे. ही मालिका २७ नोव्हेंबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे.