ठळक मुद्देमाझ्या महाविद्यालयीन दिवसांत मी आणि माझे मित्र चंदीगड इंटरसिटी ट्रेनच्या द्वितीय श्रेणी डब्यातून प्रवास करायचो आणि गिटार वाजवून गाणी म्हणून गर्दी जमवायचो. कधीकधी लोक आमच्या गाण्याने प्रभावित होऊन आम्हाला पैसे द्यायचे.
द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम असून बॉलिवूडमधील मंडळी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाला पहिली पसंती देतात. या कार्यक्रमात आजवर बॉलिवूडमधील अनेक कलाकार, गायक, दिग्दर्शक, निर्माते तसेच खेळ जगतातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. अलीकडेच राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणारा आयुष्मान खुराणा लवकरच सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘द कपिल शर्मा शो’मध्ये दिसणार आहे. त्याच्याबरोबर ‘ड्रिम गर्ल’ या त्यांच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी अभिनेत्री नुसरत भरुचा उपस्थित असणार आहे. कपिल आणि त्याच्या टीमसोबत गप्पा मारत असताना आयुषमान आणि नुसरतने त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही मनोरंजक किस्से सांगितले. पैसे कमावण्यासाठी तो आणि त्याचे मित्र ट्रेनमध्ये कशाप्रकारे गिटार वाजवत याविषयी आयुषमानने या कार्यक्रमात सांगितले.
द कपिल शर्मा या कार्यक्रमाच्या दरम्यान कपिलने आयुषमान कॉलेजमध्ये असताना ट्रेनमध्ये गिटार वाजवून अतिरिक्त पैसे कमवायचा या अफवेविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याला पुष्टी देत आयुषामानने सांगितले, “हो, हे खरे आहे की माझ्या महाविद्यालयीन दिवसांत मी आणि माझे मित्र चंदीगड इंटरसिटी ट्रेनच्या द्वितीय श्रेणी डब्यातून प्रवास करायचो आणि गिटार वाजवून गाणी म्हणून गर्दी जमवायचो. कधीकधी लोक आमच्या गाण्याने प्रभावित होऊन आम्हाला पैसे द्यायचे. एका दिवसात आम्ही असे जवळपास 1,000 रुपये कमावले आहेत.” उत्साहात येऊन आयुषमानने असा देखील खुलासा केला की, बर्याचदा या पैशांतून आम्ही मित्र मिळून गोव्याला फिरायला जायचो.
या कार्यक्रमात नुसरतने पुढे सांगितले की, ती लहान असताना खूपच डरपोक होती. त्यामुळे ती 15 वर्षांची होईपर्यंत तिच्या आई वडिलांच्या मध्ये झोपत असे. तिने पुढे हे देखील सांगितले की, तिला पांढरी कॉफी मनापासून आवडते आणि निरोगी-चमकदार त्वचेसाठी तशी कॉफी पिण्याची ती शिफारस करते.
प्रेक्षकांना ‘द कपिल शर्मा शो’ शनिवार आणि रविवारी रात्री 9 वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर पाहायला मिळणार आहे.