बाबा रामदेव यांनी सबसे बडा कलाकारमध्ये सांगितली त्यांच्या लहानपणीची एक भयानक आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2017 6:39 AM
सबसे बडा कलाकार हा कार्यक्रम सुरू होऊन काहीच दिवस झाले आहेत. पण या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत ...
सबसे बडा कलाकार हा कार्यक्रम सुरू होऊन काहीच दिवस झाले आहेत. पण या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. कार्यक्रमातील चिमुकले स्पर्धक तर प्रेक्षकांचे चांगलेच मन जिंकत आहेत. त्यामुळे अनेक सेलिब्रेटी या कार्यक्रमात हजेरी लावत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. या कार्यक्रमात रवीना टंडन, अर्शद वारसी आणि बोमन इराणी परीक्षकाची भूमिका साकारत आहेत. सबसे बडा कलाकार या कार्यक्रमाच्या आगामी भागात बाबा रामदेव आपल्याला दिसणार असून ते लहान मुलांसोबत खूप धमाल मस्ती करणार आहेत आणि एवढेच नव्हे तर आपल्या लहानपणीची काही गुपितेदेखील ते उपस्थितांसोबत शेअर करणार आहेत. या कार्यक्रमात विराज त्यागी हा स्पर्धक आपल्याला पाहायला मिळत आहे. तो एक खूपच चांगला अभिनेता आहे. तो नेहमीच त्याच्या अभिनयाद्वारे परीक्षकांचे आणि प्रेक्षकांचे मन जिंकत असतो. या कार्यक्रमात बाबा रामदेव आले असल्याने त्याच्या आईने त्याच्या लहानपणीची एक गोष्ट आवर्जून सांगितली. त्याच्या आईने सांगितले की, विराज दोन वर्षांचा असताना दररोज रात्री झोपताना त्याच्या नाकातून रक्त येत असे. पण योगा केल्यामुळे त्याचा तो आजार बरा होण्यास मदत झाली. त्यावर बाबा रामदेव यांनीदेखील त्यांच्या लहानपणीच्या एका आठवणीला उजाळा दिला. ते म्हणाले, मी लहान असताना मला स्ट्रोक आला होता. ज्याच्यामुळे माझे संपूर्ण डावे अंग पांगळे झाले होते. पण मला देखील योगा करूनच फायदा झाला.बाबा रामदेव यांच्या आयुष्यातील ही एक भयानक आठवण आहे. पण त्यांनी त्यांच्या इच्छाशक्तीच्या जोरावर आयुष्यात आलेल्या या संकटाला मात दिली.