गेल्या काही दिवसांत देशातील महिला लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. कोलकाता बलात्कार आणि खून प्रकरणानंतर बदलापूरमधील शाळकरी विद्यार्थिंनींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. बदलापूरमधील आदर्श महाविद्यालयातील दोन चिमुकल्या विद्यार्थींनींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. याबाबत मराठी अभिनेत्री पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
मराठी अभिनेत्री सुरभी भावे हिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिने बदलापूरमधील या घटनेचा निषेध करत तीव्र संताप व्यक्त केला आहे. "बदलापूरमध्ये साडेतीन वर्षांच्या दोन मुलींवर त्यांच्या शाळेत लैंगिक अत्याचार...एका मुलीची आई म्हणून दररोज जीव टांगणीला लागेल असा प्रसंग!! माणुसकीचा अंत होत आहे हे निश्चित...त्या पालकांवर काय प्रसंग ओढवला असेल याची कल्पना सुद्धा करवत नाहीये...कधी अश्या आरोपींना डायरेक्ट मृत्यूची शिक्षा होईल या देशात देव जाणे", असं सुरभीने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
बदलापूर शहरात संस्कृतीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका नामांकित शाळेतील चार वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर नराधमाने अत्याचार केले आहेत. या प्रकरणात एका मुलीवर अत्याचार करण्यात आले आहेत, तर दुसऱ्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुली प्रसाधनगृहात जात असताना शाळेतील एका कर्मचाऱ्याने संतापजनक प्रकार मुलींसोबत केला आहे. दोन्ही मुलींनी पालकांना याबाबत माहिती दिल्यानंतर पालकांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करून घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. 12 आणि 13 ऑगस्टला हा प्रकार घडला होता. त्यानंतर पालकांनी शाळा प्रशासनाला माहिती दिल्यावर मुलींची खाजगी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीनंतर मुलींवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले.
बदलापूर शहरात काही दिवसांपूर्वीच एका बारा वर्षे मुलीवर सुद्धा अत्याचार झाला होता. याचा अजून पोलिसांना तपास लागलेला नाही. त्यातच आता हा समाजाला काळीमा फासणारा प्रकार घडल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणानंतर संतप्त पालकांनी आज बदलापूर स्थानकात रेल रोको आंदोलन केलं.