आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेसृष्टीत पदार्पण करणारा स्टारकिड म्हणजे सोहम बांदेकर (soham bandekar). 'नवे लक्ष्य' या मालिकेच्या माध्यमातून सोहमने मराठी कलाविश्वात पदार्पण केलं. या मालिकेतील त्याची भूमिका विशेष गाजली. तसंच अलिकडेच तो बाईपण भारी देवा या सिनेमातही कॅमियो रोलमध्ये झळकला होता. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर तो चर्चेत आहे. यात अलिकडेच त्याने ठरलं तर मग या मालिकेच्या टीमसह सिद्धीविनायक मंदिरात जाऊ बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी बोलत असताना लोकांचा माझ्याबद्दल चुकीचा गैरसमज आहे, असं तो म्हणाला.
सोहम सोशल मीडियावर बराच सक्रीय आहे. त्यामुळे अनेकदा तो लाइव्ह किंवा आस्क मी एनिथिंग यासारखे सेशन घेऊन चाहत्यांसोबत थेट संपर्क साधत असतो. मात्र, यावेळी पहिल्यांदाच तो त्याच्या करिअरविषयी व्यक्त झाला आहे. लोकांचा माझ्याविषयी गैरसमज असल्याचं त्याने म्हटलं आहे.
"मी अजिबात माजोरडा नाहीये. पण, लोकांना मी माजोरडा आहे असं का वाटतं तेच कळत नाही. याला कामाची गरज नाहीये असं वाटतं. पण, तसं अजिबात नाहीये. माझ्यासाठी हे सोपं नाही. मी कलाकाराचा मुलगा आहे त्यामुळे माझ्याकडे ती शिडी आहे असं नाही. मी अजूनही ऑडिशन, लूक टेस्ट देतो. जेव्हा मला काम मिळेल त्यावेळी नक्कीच मी तुम्हाला त्याविषयी सांगेन", असं सोहम म्हणाला.
दरम्यान, ठरलं तर मग या मालिकेची निर्मिती आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांनी केली आहे. त्यामुळे या मालिकेचे २०० भाग पूर्ण झाल्यामुळे मालिकेच्या संपूर्ण टीमने सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. यावेळी सोहमदेखील त्यांच्यासोबत होता.