छोट्या पडद्यावरील 'ठरलं तर मग' मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. स्टार प्रवाहवरील या मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी आणि अमित भानुशाली हे कलाकार मुख्य भूमिका साकारत आहे. या मालिकेत जुई सायलीच्या भूमिकेत आहे. तर अभिनेता अमित भानुशाली अर्जुन सुभेदार ही भूमिका साकारत आहे. ठरलं तर मग ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. या मालिकेत आता 'बाईपण भारी देवा' फेम अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे. अभिनेत्री शिल्पा नवलकर ठरलं तर मग मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या नव्या भागाचा प्रोमो समोर आला आहे.
'ठरलं तर मग' मालिकेत शिल्पा नवलकर सायलीची आई प्रतिमाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या मालिकेच्या सुरुवातीच्या भागात शिल्पा नवलकर दिसली होती. मालिकेत तिचा अपघात झाल्याचं दाखविण्यात आलं होतं. त्यानंतर शिल्पा मालिकेत दिसली नव्हती. परंतु, आता पुन्हा शिल्पाची ठरलं तर मग मालिकेत एन्ट्री होणार आहे. त्यामुळे सायलीची आई अपघातातून वाचली होती का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. यामुळे मालिकेचं कथानक पुन्हा रंजक वळणावर आलं आहे.
'ठरलं तर मग' मालिकेच्या प्रदर्शित करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये पूर्णा आजी प्रतिमाचा फोटो बघून "माझे डोळे मिटण्याआधी एकदा तरी मला दिसशील का?" असं म्हणताना दिसते. त्यानंतर सायली मंदिरात गेली असता प्रियाचा धक्का लागून तिच्या हातून ताटातील पूजेचं साहित्य खाली पडतं. सायलीच्या ताटातून पडलेलं साहित्य प्रतिमा उचलून देते. पण, तिने डोक्यावर ओढणी घेतलेली असल्याने तिचा चेहरा सायलीला दिसत नाही. आता मालिकेत सायली आणि तिच्या आईची भेट होणार का? हे पाहणं रंजक ठरणार आहे.
"मी राहुल गांधींचा बायोपिक केला तर तुम्हाला बघण्याचा अट्टाहास नाही", सुबोध भावे असं का म्हणाला?
स्टार प्रवाहवरील या मालिकेने अगदी कमी काळात लोकप्रियतेचं शिखर गाठलं. इतर मालिकांप्रमाणेच 'ठरलं तर मग' मालिकेवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. या मालिकेत काही दिवसांपूर्वीच 'आई कुठे काय करते' फेम मयुर खांडगेची या मालिकेत एन्ट्री झाली होती. या मालिकेत ते महिपत ही भूमिका साकारत आहेत.