सुमारे तीन वर्षांहून अधिक काळापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या ‘बाळू मामाच्या नावानं चांगभलं’ ( Balumama Chya Navan Chang Bhala) या मालिकेत बाळूमामांची भूमिका साकारणारा अभिनेता सुमित पुसावळे (Sumeet Pusavale) याने एक आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. होय, नुकताच सुमितचा साखरपुडा पार पडला. सुमितने साखरपुड्याच्या दिवशीचा फोटो शेअर करताच चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
सुमित लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. पण त्याआधी त्याचा साखरपुडा पार पडला. भावी पत्नीसोबतचा एक सुंदर फोटो त्याने शेअर केला. ‘उनका हाथ पकडना तो बस एक बहाना था, मकसद तो लकीरोंसे लकीर जोडना था...,’ असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. या फोटोत सुमित व त्याची होणारी बायको दोघंही दाक्षिणात्य वेषभूषेत दिसत आहेत.
प्री वेडिंग फोटोशूटचा एक फोटोही त्याने शेअर केला आहे. सुमित गुडघ्यावर बसून आपल्या होणाºया बायकोला प्रपोज करतोय, असा हा फोटो आहे. सुमितच्या होणाऱ्या बायकोचं नाव मोनिका आहे.
सुमित पूसावळे हा मूळचा दिघंजी गावचा. शालेय शिक्षणानंतर सुमित पुण्यात आला. इथे त्याने हॉटेल मॅनेजमेंटची पदवी मिळवली आणि काही काळ याच क्षेत्रात नोकरी केली. त्याला स्वत:चं रेस्टॉरंट उभारायचं होतं. मात्र लहानपणापासूनच शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाल्यानं त्याच्यात कलेची आवड निर्माण झाली.
मुंबईला गेल्यावर त्याला हिंदी चित्रपटासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. सरगम या चित्रपटातून तो झळकला होता. त्यानंतर लागीरं झालं जी, स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतून तो लाइमलाइटमध्ये आला. 2018 मध्ये त्याने ‘लागीरं झालं जी’या मालिकेत खलनायकी भूमिका साकारली होती. या मालिकेनंतर त्याने पुन्हा कधी मागे वळून पाहिलं नाही. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या लोकप्रिय मालिकेत त्याने साकारलेली महाडिक राजे यांची भूमिकाही गाजली होती. सुमितने बॉलिवूडची देसी गर्ल अर्थात अभिनेत्री प्रियंका चोप्रासोबतही काम केलंय. प्रियंका चोप्राच्या एका चित्रपटासाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलंय.