मुंबई - झी मराठीवर अभिनेता सुबोध भावेचा नवा शो सध्या बराच व्हायरल होत आहे. त्याचं कारण म्हणजे या शोमध्ये सहभाग घेतलेल्या पाहुण्या राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे. बस बाई बस(Bas Bai Bas) हा शो २९ जुलैपासून झी मराठीवर येतोय. मात्र त्याचा प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. प्रदर्शनाआधीच या शो बाबत विविध चर्चा सुरू झाली आहे. या शो च्या पहिल्या भागात सुप्रिया सुळेंनी दिलखुलासपणे सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली.
काही प्रश्नोत्तरे, गमती जमती, किस्से आणि धम्माल कार्यक्रम असलेल्या शो मध्ये सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी संवाद साधला. खरेतर हा संवाद प्रत्यक्षात नव्हे तर एका खेळाच्या माध्यमातून होता. झी मराठीच्या यूट्यूब चॅनेलवर या कार्यक्रमाचा काही भाग दाखवण्यात आला. यात सुप्रिया सुळेंना नेत्यांचे फोटो दाखवले गेले आणि त्या फोटोतील नेत्यासोबत संवाद साधण्याची संधी दिली. त्यावर सुळेंनीही बोलक्या प्रतिक्रिया दिल्या.
त्यात पंतप्रधान मोदींशी संवाद साधताना सुप्रिया सुळे चक्क गुजराती भाषेत बोलल्या. सुप्रिया सुळेंचं इतकं उत्तम गुजराती ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. गुजराती भाषेत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, नमस्ते मोदी, कैसे हो आप, मै गुजरात होके आयी, खूप चांगले आहे. सूरतचा फाफडा मला खूप आवडतो. अमितभाई संसदेत रोज भेटतात. तुम्ही पण येत जा. तुमचं भाषण ऐकल्यानंतर मला छान वाटतं. थोडं गुजराती, थोडं मराठी बोलते मी. पहिल्यांदा आपण भेटलो तेव्हा तुम्ही गुजरातचे सीएम होता. मी अनुराग ठाकूर, तुम्ही एकत्र मॅच पाहिली. खूप मज्जा आली होती. तुमची वेळ महत्वाची आहे, आपण पंतप्रधान आहात याची मला जाणीव आहे. चला निघते मी असं त्यांनी म्हटलं.
त्याचसोबत या कार्यक्रमात सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना तुम्ही इतके कमी बोलता की मला दडपण येते. मी बोलतच राहते आपलं वन-वे नातं आहे असेच वाटतं असं सांगितले. त्या म्हणाल्या की, नमस्कार कसे आहात? तुम्ही कमी बोलता आणि मी नेहमी बोलतच राहते. त्यादिवशी आपली भेट उद्धवजींच्या कॅबिनमध्ये झाली होती. तेव्हा तुम्ही मला बोलले नाही आपण सूरतला निघणार आहेत. आपण विधानभवनात भेटलो असतो. तुमच्यामुळे आता मी घरी खूप चिडवते. कारण पवार माझे वडील आणि आईचं आडनाव शिंदे. परवा दादाला मी सांगितले किती मज्जा येणार. पवारविरुद्ध शिंदे, बाबा जिंकणार की आई हे काळच ठरवेल असा गमतीशीर किस्सा त्यांनी शेअर केला.
दरम्यान, श्रीकांत खूप प्रिय आहे. तो फार गोड मुलगा आहे. परवा भेटला होता संसदेत, तुम्ही आला होता परंतु आपली भेट झाली नाही. श्रीकांत भेटतो. बघा बाबा, सगळीकडे पाऊस वैगेरे पडतोय, चिन्हाचं उरकून टाका जरा कामाला लागूया. सव्वा महिने झाले माझ्या कामाचा खोळंबा झाला आहे. अधिकाऱ्यांना फोन केला तर आधी मंत्रीच जागेवर नाही असं म्हणतात. जरा तेवढं बघा, माझी मतदारसंघातील फार कामे अडकली आहेत. थोडं लवकर करून घ्या, खूप खूप शुभेच्छा..भेटूया मग जय महाराष्ट्र अशी विनंती सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री शिंदेंना केली.