या कारणामुळे कुछ कुछ होता है या चित्रपटाचे लिखाण करायला जावेद अख्तर यांनी दिला होता नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 9:03 AM
जावेद अख्तर हे देशातील सर्वोत्तम लेखकांपैकी एक मानले जातात. त्यांच्या कामाचे नेहमीच कौतुक केले जाते. ते आज बॉलिवूडमधील सगळ्यात ...
जावेद अख्तर हे देशातील सर्वोत्तम लेखकांपैकी एक मानले जातात. त्यांच्या कामाचे नेहमीच कौतुक केले जाते. ते आज बॉलिवूडमधील सगळ्यात चांगले लेखक असल्याने सगळ्याच दिग्दर्शक-निर्मात्यांना त्यांच्यासोबत काम करायचे असते. टेड टॉक्स इंडिया नयी सोच हा कार्यक्रम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून अनेक दिग्गज आपल्याला या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहेत. या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासूनच या कार्यक्रमाविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. या कार्यक्रमात पॉवर ऑफ वर्ड्स या संकल्पनेअंतर्गत जावेद अख्तर यांना नुकतेच भाषण करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते आणि अर्थातच त्यांनी आपल्या भाषणातून प्रेक्षकांचे मन जिंकले. जावेद अख्तर यांचे भाषण ऐकून तर या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक शाहरुख खान भारावून गेला होता.या भाषणानंतर शाहरुख खान आणि जावेद अख्तर यांनी खूप साऱ्या गप्पा मारल्या. जावेद अख्तर यांनी त्यांच्या करियरमधील अनेक आठवणींना उजाळा दिला. त्यांनी त्यांच्या करियरमधील अनेक किस्से सांगितले. या वेळी त्यांनी शाहरुख खानच्या कुछ कुछ होता है या चित्रपटाच्या वेळेचा देखील एक किस्सा सांगितला. त्यांनी ९० च्या दशकातील कुछ कुछ होता है या चित्रपटाचे लिखाण का केले नाही याबद्दल सांगितले. ते म्हणाले, “मला असं वाटलं की, या चित्रपटाच्या नावामध्येच दुहेरी अर्थ होता. त्यामुळे या प्रोजेक्टचे लिखाण करायला मी तयार नव्हतो.” करण जोहरच्या या ब्लॉकबस्टरसाठी त्यांनी लिखाण केले असते तर ते कसे असते असा प्रश्न मनात आल्यावाचून राहत नाही. पण पुढे ते म्हणाले, “पण शाहरुख खानचा कल हो ना हो मला अतिशय आवडला होता आणि मला आनंद आहे की, त्या प्रवासाचा एक हिस्सा मी बनू शकलो. या चित्रपटातील कुछ तो हुआ है, कुछ हो गया है हे मी लिहिलेले गीत लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. जावेद अख्तर यांना प्रेक्षकांना टेड टॉक्स इंडिया नयी सोच या कार्यक्रमात १७ डिसेंबरला पाहायला मिळणार आहे. Also Read : शाहरूख खान सांगतोय, हे काम करणे होते माझ्यासाठी खूप कठीण