मुंबई - तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवून आहे. सुमारे १३-१४ वर्षांपासून ही मालिका सातत्याने सुरू असून, टीआरपीमध्येही आघाडीच्या मालिकांमध्ये या मालिकेने स्थान कायम ठेवले आहे. या मालिकेमधील जेठालाल, बबिता, पत्रकार पोपटलाल यांच्याप्रमाणेच सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आत्माराम भिडे यांचंही पात्र लोकप्रिय आहे. आत्माराम भिडे यांचं पात्र साकारणाऱ्या मंदार चंदावरकर यांच्याबाबत काही खाग गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मंदार चंदावरकर यांचा सुरुवातीपासूनच अभिनय क्षेत्रामध्ये रस होता. मात्र ते प्रत्यक्षात खूप शिकलेले आणि पेशाने मेकॅनिकल इंजिनियर होते. त्यांनी दुबईस्थित एमएनसीमध्ये अनेक वर्षे नोकरीसुद्धा केली होती. मात्र एवढ्या चांगल्या नोकरीनंतरही त्यांच्या मनातील अभिनयाची ओढ कमी झाली नव्हती. दुबईत नोकरी करत असतानाच त्यांना अभिनय केला पाहिजे याची जाणीव झाली. त्यानंतर ते आपली नोकरी सोडून ते दुबईमधून भारतामध्ये परतले.
भारतात परतल्यानंतर मंदार चंदावरकर यांनी सर्वप्रथम नाट्यक्षेत्रात उतरून अनेक नाटकांमध्ये काम केले. सुरुवातीला त्यांनी मराठी मालिकांमध्ये काम केले. त्यानंतर हळूहळू त्यांचा अभिनय अधिकाधिक प्रगल्भ होत गेला. २००८ मध्ये त्यांनी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमध्ये काम करण्यास सुरुवात केली. या मालिकेत ते साकारत असलेले सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आत्माराम भिडे हे पात्र लोकप्रिय झाले.
या मालिकेतील आत्माराम भिडे यांची पत्नी माधवीची भूमिका साकारणाऱ्या सोनालिका जोशी यांच्यामुळे मंदार चंदावरकर यांना आत्माराम भिडेंची भूमिका मिळाली होती. त्यांनीच मंदार यांचे नाव या भूमिकेसाठी सूचवले होते. तेव्हापासून गेली १३ वर्षे ते या मालिकेमध्ये आत्माराम भिडे साकारत आहेत.