नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे (Hruta Durgule). हृता दुर्गुळेने दुर्वा मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. अनन्या, टाइमपास ३ या चित्रपटातून तिने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. हृताला अभिनय क्षेत्रात करिअर करायचे नव्हते. अचानक तिला पहिल्या मालिकेची ऑफर मिळाली आणि तिने कलाविश्वात पदार्पण केले.
हृता दुर्गुळेने माटुंग्यातील रुईया महाविद्यालयातून शिक्षण घेतले. ती अॅडव्हर्टायझिंगमध्ये शिक्षण घेत असताना तिने स्टार प्रवाहवरील पुढचं पाऊल या मालिकेत इंटर्नशिप केली होती. या मालिकेत ती कॉम्च्युम एडी म्हणून काम शिकत होती. तिची इंटर्नशिप सुरू असतानाच, तिला त्याच मालिकेच्या सेटवर दिग्दर्शक रसिका देवधर यांनी पाहिले आणि तिला दुर्वा मालिकेची ऑफर दिली.अशाप्रकारे तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले.
अभिनय क्षेत्रात यायचा विचार केला नव्हता..
याबद्दल हृता म्हणाली होती की, या क्षेत्रात यायचं असं मी कधीही ठरवलं नव्हतं. घरात आधी कोणीही अभिनय क्षेत्रात नव्हते. तसेच घरातले वातावरणही शिस्तीचे होते. त्यामुळे शिक्षणाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीचा विचार केला नव्हता. मालिकेच्या सेटवर इंटर्नशिप करत असताना मालिकेची ऑफर मिळाली. रसिका देवधर यांनी हृताला पाहिल्यानंतर तिला ऑडिशन देण्याचा सल्ला दिला. तिला घरातूनही यासाठी होकार आला आणि केवळ छंद म्हणून तिने मालिका स्वीकारली होती. मात्र आज हृता महाराष्ट्राची क्रश बनली आहे.