छोट्या पडद्यावरील विनोदी कार्यक्रम महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) घराघरात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातून प्रेक्षकांना हास्याची मेजवानीच मिळत असते. या शोमधील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या कार्यक्रमातील कलाकारदेखील घराघरात लोकप्रिय झाले आहेत. या कार्यक्रमातील एक कलाकार जो फिल्टर पाड्यातील बच्चन म्हणून ओळखला जातो, तो म्हणजे गौरव मोरे (Gaurav More). तो उत्तम अभिनयशैली आणि विनोदकौशल्य यांच्या जोरावर अल्पावधीत लोकप्रिय झाला. दरम्यान गौरव मोरेने नुकतेच एका मुलाखतीत या कार्यक्रमातील सहकलाकारांबद्दल सांगितले.
गौरव मोरे त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या हटके हेअर स्टाइलमुळेही चर्चेत येत असतो. नुकतेच त्याने महाराष्ट्र टाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील मित्रमंडळींचा उल्लेख करत त्यांच्याबद्दल प्रतिक्रिया दिली. तो प्रसाद खांडेकरबद्दल म्हणाला की, तो माझा कॉलेजपासूनचा मित्र आहे. त्यामुळे आमची मैत्री पूर्वीपासूनच घट्ट आहे. तर नम्रता संभेराव ही अतिशय हुशार अभिनेत्री आहे. ती ज्या पद्धतीने भूमिका साकारते, ते जबरदस्त आहे. समीर चौगुले हा दादा आहे. मला जुगलबंदीसाठी ओंकार भोजने आवडतो. तो भन्नाट अभिनेता आणि उत्तम श्रोतादेखील आहे.
''प्राजक्ताला जे सुचतं ते कुणालाही सुचणार नाही...''
या कार्यक्रमातील सूत्रसंचालिका प्राजक्ता माळीबद्दल गौरव मोरे म्हणाला की, माझी प्राजक्ताशी खास मैत्री आहे. तिचे तिथे असणे हे आम्हाला सगळ्यांना आवडते. कारण तिला जे सुचते ते कुणालाही सुचणार नाही. ती खूप छान पद्धतीने प्रोत्साहन देते.