‘बेहद 2’ या मालिकेतील लोकप्रिय अभिनेता शिवीन नारंग याला अचानक रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. रविवारी संध्याकाळी त्याला मुंबईस्थित अंधेरीच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. अर्थात आता त्याची प्रकृती ठीक आहे.शिवीनला काय झाले, असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. कारण काही दिवसांपूर्वी शिवीन नारंग मुंबईमध्ये राहत असलेली बिल्डिंग कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा धोका लक्षात घेता सील करण्यात आली होती. अशात शिवीनला हॉस्पिलटलमध्ये दाखल करण्यात आल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र त्याला हॉस्पिटलमध्ये का भरती करावे लागले, याचे उत्तर मिळाले आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, शिवीन चुकून घरातील काचेच्या टेबलावर पडला. यामुळे त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्याच्या जवळच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, शिवीन ग्लासच्या टेबलावर पडताच ग्लासचे तुकडे झालेत. यामुळे शिवीनच्या डाव्या हाताला दुखापत झाली. बरेच रक्त वाहून गेले. यानंतर त्याला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची जखम खोल असल्याने अद्याप त्याला डिस्चार्ज मिळालेला नाही. अर्थात शिवीनची प्रकृती स्थिर असून घाबरण्याचे काहीही कारण नाही. सोशल डिस्टंसिंगच्या कारणामुळे त्याच्या पालकांनाही त्याला भेटण्याची परवानगी तूर्तास नाकारण्यात आली आहे.
गेल्या पाच महिन्यातील शिवीनचा हा दुसरा अपघात आहे. गत 1 जानेवारीला ‘बेहद 2’च्या शूटींगदरम्यान त्याचा हात फ्रॅक्चर झाला होता.
शिवीन हा मलाडमध्ये राहतो़शिवीन सध्या मुंबईमध्ये एकटा राहत आहे. त्याचे आई-वडील लॉकडाऊनमुळे दुसरीकडे अडकले आहेत. काही दिवसांपूर्वी तो राहत असलेल्या बिल्डिंगमध्ये कोरोना रूग्ण आढळ्याने त्याची बिल्डिंग सील करण्यात आली होती. शिवीन नारंग ‘बेहद 2’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचला होता. मालिकेत जेनिफर विंगेटसोबतची त्याची ऑनस्क्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. लॉकडाऊनमुळे या मालिकेचे शूटींग ठप्प पडले. आता निर्मात्यांनी ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.