Join us

'भाभीजी घर पर है' फेम अभिनेत्यासोबत झालेला लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, म्हणाला- "मी १३ वर्षांचा असताना..."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2024 4:42 PM

१३ वर्षांचा असताना लैंगिक शोषणाचा प्रयत्न झाल्याचा खुलासा सानंद वर्माने मुलाखतीत केला.

टीव्हीवरील अनेक लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे 'भाभीजी घर पर है'. या मालिकेत अनोखे लाल ही भूमिका साकारून अभिनेता सानंद वर्मा घराघरात पोहोचला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने करिअर आणि वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलं. यावेळी त्याने इंडस्ट्रीतील कास्टिंग काउचबद्दल बोलताना त्याच्याबरोबर लहानपणी घडलेला एक प्रसंग सांगितला. १३ वर्षांचा असताना लैंगिक शोषणाचा प्रयत्न झाल्याचा खुलासा सानंद वर्माने मुलाखतीत केला. 

सानंद वर्माने टाइम्स नाऊला नुकतीच मुलाखत दिली. बालपणीचा हा प्रसंग सांगताना तो म्हणाला, "मी १३ वर्षांचा होतो आणि मला क्रिकेटर व्हायचं होतं. मी पटना(बिहार) क्रिकेट टीमसाठी प्रयत्न करत होतो. आम्ही गरीब होतो. तरीदेखील वडिलांनी माझ्यासाठी पांढऱ्या रंगाची पँट, शर्ट आणि एक बॅट घेऊन दिली होती. एका मोठ्या व्यक्तीने माझ्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला होता. मी तेव्हा खूप घाबरलो होतो. त्यामुळे मी तेथून पळ काढला. त्यानंतर मी पुन्हा कधीच क्रिकेट खेळलो नाही. हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट अनुभव होता." सानंद शर्मा आजही हा प्रसंग विसरू शकलेला नाही. 

"या घटनेमुळे मी आणखी स्ट्राँग झालो. लैंगिक शोषण ही अशी गोष्ट आहे जी आपण कधीच विसरू शकत नाही. पण, ज्यांच्याबरोबर या गोष्टी घडतात ते स्ट्राँग होतात. इंडस्ट्रीमध्येही या गोष्टी घडतात. पण, सुदैवाने माझ्याबरोबर अद्याप अशी कोणतीही गोष्ट घडलेली नाही. पण, लोकांनी माझ्याबरोबर त्यांना आलेले अनेक अनुभव शेअर केले आहेत. या गोष्टी घडल्या नाही पाहिजेत," असंही त्याने पुढे सांगितलं. 

टॅग्स :टिव्ही कलाकारलैंगिक छळ