ठळक मुद्देपडद्यावरचा हा हप्पू सिंग रिअल लाईफमध्ये कमालीचा स्टाईलिश आहे. त्याचे फोटो पाहिल्यानंतर हाच तो हप्पू सिंग यावर विश्वास बसत नाही.
‘भाभी जी घर पर हैं’ या लोकप्रिय मालिकेतील हप्पू सिंगचे पात्र घराघरात पोहोचले आहे. हप्पू सिंगची भूमिका साकारणा-या अभिनेत्याचे नाव आहे योगेश त्रिपाठी. अलीकडे एका मुलाखतीत योगेशने आपली स्ट्रगल स्टोरी शेअर केली.‘एफआयआर’ या मालिकेनंतर चार वर्षांनी योगेशला ‘भाभी जी घर पर हैं’ ही मालिका मिळाली. आज योगेश इंडस्ट्रीतील चर्चित चेहरा आहे. त्याच्या कॉमेडीचे लोक चाहते आहेत. पण इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता.
योगेश हा उत्तर प्रदेशातल्या झाशी शहराचा राहणारा आहे. त्याच्या कुटुंबातील बहुतांश लोक शिक्षकी पेशात आहेत. अशात योगेशही शिक्षकी पेशा निवडले, अशीच सर्वांना अपेक्षा होती. पण योगेशने अनपेक्षितपणे अभिनय क्षेत्राची निवड केली.
योगेशने चार वर्षे लखनौमध्ये थिएटरमध्ये काम केले. 2005 मध्ये आपले नशीब आजमावण्यासाठी तो मायानगरी मुंबईत आला. पण मुंबईत त्याचा कुणीही गॉडफादर नव्हता. होता तो केवळ आत्मविश्वास. मुंबईत एका लहानशा भूमिकेसाठी योगेशने दोन वर्षे खर्ची घातली.
तो सांगतो,‘सकाळी 10 वाजता मी ऑडिशनसाठी पोहोचायचो आणि 12 तास रांगेत उभा राहायचो. पण इतके करूनही पदरी निराशा पडायची. मी रिजेक्ट व्हायचो.’
योगेशला त्याचा पहिला ब्रेक 2007 मध्ये मिळाला. यावर्षांत क्लोरोमिंटची एक जाहिरात त्याला मिळाली. ही जाहिरात कमालीची गाजली आणि यामुळे ‘एफआयआर’ ही मालिका त्याला मिळाली. या मालिकेत योगेशचा साईड रोल होता. पण असे असतानाही या शोने योगेशला एक वेगळी ओळख दिली.
सहा वर्षे तो या शोचा भाग होता. यानंतरच्या आत्तापर्यंतच्या प्रवासात योगेशने 160 पेक्षा अधिक भूमिका साकारल्या. 2015 मध्ये ‘भाभी जी घर पर हैं’ या मालिकेतील हप्पू सिंगच्या भूमिकेसाठी त्याची निवड झाली.
पडद्यावरचा हा हप्पू सिंग रिअल लाईफमध्ये कमालीचा स्टाईलिश आहे. त्याचे फोटो पाहिल्यानंतर हाच तो हप्पू सिंग यावर विश्वास बसत नाही.