सोनी सब वाहिनीवर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'नमुने' मालिकेत अभिनेत्री तोरल रासपुत्र भैरवीची भूमिका साकारताना दिसणार आहे. भैरवी व तिच्या व्यक्तीमत्त्वात साम्य असल्याचे तोरल सांगते.
तोरल म्हणाली की, 'हे एक सकारात्मक, प्रेमळ आणि अगदी कणखर पात्र आहे. नमुनेमधल्या भैरवीसारखीच मी आहे. मी माझ्या खऱ्या आयुष्यात अशीच काळजी घेणारी आहे आणि माझेही माझ्या कुटुंबावर फार प्रेम आहे. मला नेहमी हसतमुख राहायला आवडते, खळखळून हसायला आवडते. हां, मी काही जुगाडू वगैरे नाहीये आणि माझ्या भूमिकेसारखी बबली वगैरै पण नाही.'भैरवी पात्र वास्तवातील आयुष्यापासून प्रेरित आहे. मी आतापर्यंत केलेल्या भूमिका खूपच गंभीर होत्या. त्यात भरपूर नाट्य होते, प्रदीर्घ संवाद होते. मला वाटते, या भूमिकेला उत्स्फूर्त आणि परिस्थितीतून येणाऱ्या विनोदाची गरज आहे आणि अर्थात ते मजेशीर असल्याचे तोरलने सांगितले.'नमुने' मालिकेची कथा निरंजनच्या आयुष्याभोवती फिरते. कुणाल कुमार याने निरंजनची भूमिका साकारली आहे. त्याचे आयुष्य आणि दैनंदिन जबाबदाऱ्यांमध्ये पिचलेला हा निरंजन आयुष्याकडे नकारात्मक दृष्टीनेच बघतो, प्रत्येक टप्प्यावर त्याला खच दिसते, स्वभावतःच तो निराशावादी बनला आहे. त्याच्या बरोबर विरुद्ध स्वभावाची त्याची पत्नी भैरवी (तोरल रासपुत्र) अत्यंत उत्साही, आनंदी असते आणि छोट्या छोट्या गोष्टींतसुद्धा ती आनंद शोधत असते. निरंजनला पु. ल. देशपांडेंच्या कथा वाचण्याची आवड आहे. एके दिवशी, वाईट गोष्टीतही आनंद शोधण्यात निरंजनला मदत करण्यासाठी स्वतः लेखक पु. ल. निरंजनपुढे जिवंत होतात. पु. लं.च्या भूमिकेत संजय मोने दिसणार आहेत. दशमी क्रिएशन्सचे नितीन वैद्य यांनी 'नमुने' या मालिकेची निर्मिती केली असून स्वप्ना वाघमारे – जोशी आणि मनीश रायसिंग यांनी क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम केले आहे. या मालिकेत मनोरंजन क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध कलाकार सहभागी होणार आहेत. जय सिंग यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले आहे.