Join us  

संगीताच्या परंपरेला जपणारी आणि सुप्रसिद्ध गायिका आहे भैरवी वझे, मेघा धाडेने सांगितलं भूमिकेबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 12:19 PM

Megha Dhade : 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत अभिनेत्री मेघा धाडे भैरवी वझेची भूमिका साकारणार आहे.

'सावळ्याची जणू सावली' (Sawalyanchi Janu Sawali) मालिकेत अभिनेत्री मेघा धाडे (Megha Dhade) भैरवी वझेची भूमिका साकारणार आहे. आपल्या भूमिकेबद्दल संवाद साधताना मेघाने बऱ्याच गोष्टींना उजाळा दिला. मेघाने सांगितले, "माझ्या भूमिकेचं नाव आहे भैरवी वझे, ती एक अत्यंत्य महत्वाकांक्षी बाई, सुप्रसिद्ध गायिका आहे. तिने शास्त्रीय संगीतात मोठं नाव कमावलं आहे. स्वतःच गुरुकुल असेल अशी ही भैरवी. ती आपल्या संगीताच्या परंपरेला जपण्यासाठी कुठल्याही थरावर जाऊ शकते, किंवा संगीताचा  वारसा नेण्यासाठी साधण्यासाठी परिसीमा कशी गाठते तो भैरवीचा प्रवास या मालिकेत आपल्याला पाहता येणार आहे."

मेघा धाडेने या मालिकेत तिची निवड कशी झाली, याचा गंमतीशीर किस्सा सांगितला. ती म्हणाली की, इतकी लवकर कास्टिंग प्रक्रिया आजवर कोणाचीच झाली नसावी जितक्या लवकर माझी निवड या भूमिकेसाठी आणि मालिकेसाठी झाली. माझी इथे आज लूक टेस्ट आणि लगेच दुसऱ्या दिवशी शूट सुरु इतक्या लगेच ते सगळे जुळून आले. सर्वात आधी कलाकाराला भूमिका आवडली पाहिजे, मग  प्रॉडक्शन आवडलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चॅनेलने त्यांचा होकार दिला पाहिजे. मी खूप खूश आहे की इतकं सुंदर पात्र माझ्या पदरात पडलं. जेव्हा 'सावळ्याची जणू सावली'चा प्रोमो आऊट झाला तो दिवस माझ्यासाठी कुठच्या उत्सवापेक्षा कमी नव्हता, कारण ज्या दिवशी प्रोमो आला त्या दिवशी प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद आला आणि त्यासोबत मित्र परिवाराचा आणि मनोरंजन विश्वातल्या अनेक कलाकारांचे फोन आले इतका छान प्रतिसाद मिळाला. मला वाटतं की सर्व आतुरतेने वाट पाहत असावे म्हणून प्रेमाचा सगळीकडून भरभरून वर्षाव झाला. भैरवीला मालिकेत पाहून प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया असणार हे ही जाणून घेण्याची उत्सुकता आहे. 

मेघा पुढे म्हणाली की, प्राप्ती रेडकर आमच्या मालिकेची नायिका आणि भाग्यश्री दळवी जी माझ्या मुलीची भूमिका साकारत आहे या दोन मैत्रिणी मिळाल्या आहेत मला. मालिकेत भैरवीची मैत्रीण तिलोत्तमा म्हणजेच सुलेखा तळवलकर हिच्याशी अनेक वर्षांनी भेट झाली आणि आता आम्ही एकत्र काम करणार आहोत तर खूप मस्त वाटतंय. एकंदरीत 'सावळ्याची जणू सावली' चा आमचा जो परिवार आहे तो एकदम प्रेमळ आहे, खूप खुश आहे मी या परिवाराचा भाग होऊन. मालिकेच्या प्रत्येक भूमिकेवर प्रेम करा आणि आम्ही तुमच्या मनोरंजनामध्ये काही कमी ठेवणार नाही. 'सावळ्याची जणू सावली'  २३ सप्टेंबरपासून दररोज संध्याकाळी ७ वाजता झी मराठीवर पाहायला मिळेल.

टॅग्स :मेघा धाडे