आनंद, उत्साह आणि जल्लोष यांनी नटलेला क्षण म्हणजे आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन... या गणेशाच्या आगमनाचा जल्लोष नुकताच सोनी मराठीच्या ‘उत्सव गणरायाचा, महोत्सव हास्यजत्रेचा’ या पहिल्यावहिल्या दणदणीत कार्यक्रमात साजरा झाला. प्रसाद ओक आणि प्राजक्ता माळी यांनी विघ्नहर्त्याच्या साक्षीने या कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर नम्रता आवटे–संभेराव, समीर चौघुले, विशाखा सुभेदार आणि प्रसाद खांडेकर यांच्या साथीने फुलली हास्यजत्रा... या चौघांच्या जुगलबंदीनी ठाण्याच्या काशिनाथ घाणेकर सभागृहात हास्यकल्लोळ झाला. या कार्यक्रमाला चार चांद लावले आनंद शिंदे यांच्या गायकीने... आपल्या रांगड्या आवाजात सादर केलेल्या सदाबहार गीतांनी त्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. त्यानंतर वस्त्रहरण नाटकाचा सादर झालेला काही भाग प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा ठरला, तर सोनी मराठीवर सध्या गाजत असलेली मालिका ‘हृदयात वाजे समथिंग’ याचे कलाकार निखिल दामले, स्नेहा चव्हाण आणि ऐश्वर्या पवार यांनी सादर केलेला नृत्याविष्कार पाहून प्रेक्षकांच्या हृदयात समथिंग नक्कीच वाजलं.
प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या या कार्यक्रमात पुढे ‘नाद करायचा नाय’ म्हणत संतोष जुवेकर यानी रंगमंचावर प्रवेश केला आणि प्रेक्षकांनी एकच कल्ला केला. त्यानंतर संतोष जुवेकर सोबत ’इयर डाऊन’ या सोनी मराठीवरील मालिकेत असणारी प्रणाली घोगरेने सुंदर नृत्याविष्कार सादर केला आणि याच कार्यक्रमाची थेट झलक प्रेक्षकांसमोर सादर केली.
हास्याचा विस्फोट होत असतानाच रंगमंचावर अचानक भरत जाधव यांच्या रूपात मोरूची मावशी आली आणि प्रेक्षकांचे डोळे पाणावले. हास्यजत्रा भरलेली असताना मोरूच्या मावशीची आठवण न काढणं शक्यच नव्हतं. विजय चव्हाण.... एक असा कलाकार ज्यानी आपलं आयुष्य प्रेक्षकांना हसवण्यात घालवलं अशा कलाकाराच्या जाण्यानी निर्माण झालेल्या पोकळीची पुन्हा एकदा जाणीव झाली. भरत जाधव यांनी ‘टांग टिंग टिंगाक’ करत विजय चव्हाण यांना आदरांजली वाहिली.
अशा प्रकारे सांगता झालेल्या हास्यजत्रेचा पुरेपूर आनंद प्रेक्षकांनी लुटला आणि जणू गणरायाच्या साक्षीने सोनी मराठीशी आपले नाते अजून अतूट केले. हा कार्यक्रम येत्या १९ आणि २० सप्टेंबर रोजी रात्री ९.०० वा सोनी मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.