अभिनेते भरत जाधव (Bharat Jadhav) 'अस्तित्व' या नाटकातून रंगभूमीवर येत आहेत. याआधी त्यांनी 'सही रे सही','श्रीमंत दामोदर पंत','ऑल द बेस्ट' या नाटकातून रंगभूमी गाजवली. आता भरत जाधव अस्तित्वमध्ये गंभीर भूमिका साकारत आहेत. भरत जाधव यांच्या नाटकाच्या अनाऊंसमेंटवेळी नेहमी ...आणि भरत जाधव असं ऐकू येतं. जेव्हा पहिल्यांदा हे नाव लागलं होतं तेव्हाचा किस्सा त्यांनी शेअर केला आहे.
'मीडिया टॉक' या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत भरत जाधव म्हणाले, "सुधीर भटांचं 'पैसाच पैसा' या नाटकासाठी '...आणि भरत जाधव असं नाव लागलं होतं. नाटक तेव्हा चाललं नव्हतं. काही प्रॉब्लेम झाले होते. मी पण निराश झालो होतो. यानंतर सही रे सही नाटकावेळी आणि भरत जाधव अशी अनाऊंसमेंट केली. ते नाटक इतकं चाललं की तेव्हापासून ही प्रथा सुरु झाली. प्रत्येकाला वाटतं की आपणही आणि...असं नाव लावावं. पण ते आणि...ही खरंतर जबाबदारी आहे.'
'अस्तित्व' या नाटकाचा ३ नोव्हेंबर रोजी पहिला प्रयोग आहे. चिन्मयी सुमितही नाटकात मुख्य भूमिकेत आहेत. तर सलोनी सुर्वे, हार्दिक जाधव हे नवोदित कलाकार व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करत आहेत. साई पियुष यांचे या नाटकाला संगीत लाभले असून सरीता भरत जाधव या नाटकाच्या निर्माती आहेत.