'लाफ्टरक्वीन' असं बिरुद मिरवत प्रेक्षकाचं मन निखळ मनोरंजन करणारी भारती सिंह (Bharti singh) आज अनेकांमध्ये लोकप्रिय आहे. भारतीने शून्यातून विश्व निर्माण केलं आहे. त्यामुळे ती आज चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते. अनेक मुलाखतींमध्ये भारतीने तिचा संघर्षप्रवास सांगितला आहे. प्रेक्षकांना हसवणाऱ्या भारतीच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. यात अनेकांनी तिला तिच्या दिसण्यावरुन ट्रोल केलं. अलिकडेच तिने तिच्या व्लॉगमध्ये या ट्रोलिंगविषयी भाष्य केलं आहे.
सुरुवातीच्या काळात अनेकांनी भारतीला तिच्या वाढलेल्या वजनावरुन ट्रोल केलं आहे. इतकंच नाही तर अनेक स्क्रिप्टमध्येही तिची खिल्ली उडवली गेली आहे. अलिकडेच भारतीने तिचं वजन घटवलं आहे.त्यामुळे सध्या ती चर्चेत आहे. मात्र, एका व्लॉगमध्ये तिने या ट्रोलिंगविषयी भाष्य केलं. लोक किती खालच्या थराला जावून ट्रोल करतात हे तिने यावेळी सांगितलं.
"मी कधीही कोणता फोटो शेअर केला की लोक त्यावर अत्यंत वाईट कमेंट करतात. कोणी पांडा, गेंडी असं काहीही म्हणतात. पण, मला पांडा आणि गेंडी दोन्ही खूप आवडतात. लोक माझ्याविषयी काय म्हणतात याची मला जराही पर्वा नाही. मी अशा कमेंटकडे लक्षही देत नाही. मी त्या लोकांची मानसिकता समजू शकते जे अशा कमेंट करतात. कारण, ते लोक लोखंडवालामध्ये जाण्याइतके सक्षम नाहीत आणि आम्ही कुठेही जाऊ शकतो. ते फक्त आयुष्यात ठेचा खात आहेत बाकी काहीच करु शकत नाहीयेत", असं आरती म्हणाली.
दरम्यान, भारतीने इंडस्ट्रीत तिची हक्काची जागा निर्माण केली आहे. कॉमेडी सर्कस, झलक दिखला जा, नच बलिए, खतरा खतरा खतरा, अशा कितीतरी रिअॅलिटी शोमध्ये ती झळकली आहे. सध्या ती 'लाफ्टर शेफ्स-अनलिमिटेड एंटरटेनमेंट' या कार्यक्रमात दिसून येत आहे.