भारती सिंगने आज एक कॉमेडियन म्हणून छोट्या पडद्यावर आपले एक प्रस्थ निर्माण केले आहे. भारती नेहमीच लोकांना खळखळून हसवते. पण तिच्या या हास्यामागे एक दुःख लपलेले आहे. भारतीला तिच्या आयुष्यात अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला आहे.
भारतीने अमर उजालाला दिलेल्या मुलाखतीत तिला बालपणापासून कराव्या लागलेल्या संघर्षाविषयी सांगितले. तिच्या बालपणाविषयी तिने या मुलाखतीत सांगितले की, मी केवळ दोन वर्षांची असताना माझ्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे आमची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट होती. मी लहानपणापासूनच खूप काम केले आहे. माझ्या आईने तर प्रचंड हालअपेष्ठा सहन केल्या आहेत. तिने आमच्यासाठी खूप काही केले आहे. आम्ही तीन भाऊ-बहीण असून तिने आम्हाला तिघांनाही खूप चांगले शिक्षण दिले. मला आजही आठवते, माझी आई दुसऱ्यांकडे जेवण बनवायला जायची, मी देखील अनेकवेळा तिच्यासोबत तिथे जात असे. तिथे गेल्यानंतर लोकांचे घर, किचन, फ्रीज पाहिल्यानंतर आपले घर असे कधी असणार... आपल्या घरात या वस्तू कधी येणार याचा विचार मी करायचे. या सगळ्या आठवणींचा विचार केला तर आजही मला त्रास होतो.
या मुलाखतीत पुढे तिने सांगितले, आज देवाच्या दयेने माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, भलेमोठे घर आहे. मला वाटते की, सगळ्यांनी कष्ट केले पाहिजे... कधी ना कधी कष्टाचे चीज हे मिळते. मी कॉलेजमध्ये असताना मित्रमैत्रिणींसोबत मजा मस्ती करत होते. त्यावेळी सुदेश लहरी तिथून चालले होते. त्यांनी माझ्या शिक्षकांना जाऊन सांगितले की, या मस्ती करणाऱ्या मुलीला मला भेटायचे आहे. त्यांनी मला सांगितले की, कॉमेडी ड्रामामध्ये मी काम करावे अशी त्यांची इच्छा आहे. त्यांनी मला काही ओळी म्हणायला सांगितल्या आणि त्या मी त्या खूप चांगल्याप्रकारे सादर देखील केल्या. असे असले तरी कॉमेडी ड्रामाचा भाग व्हायला मी नकार दिला होता. पण माझ्या टीचरने मला सांगितले की, काहीही करून सुदेश यांना तू या कार्यक्रमात पाहिजे आहेस आणि यामुळे आमच्या कॉलेजचे देखील चांगले नाव होईल, एवढेच नव्हे तर तुझी फी माफ केली जाईल. हे सगळे ऐकल्यावर मी या कार्यक्रमासाठी होकार दिला आणि माझा अभिनयप्रवास सुरू झाला.