'चला हवा येऊ द्या' शो मधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा भाऊ कदम (Bhau Kadam) खूप लोकप्रिय झाला आहे. त्याच्या एंट्रीनेच सभागृहात हास्यकल्लोळ होतो. भाऊची स्टाईलच वेगळी आहे. विनोदाच्या अचूक टायमिंगने त्याने सर्वांना आपलंसं करुन घेतलंय. अगदी साध्या कुटुंबातून आलेला भाऊ कदम इतकी प्रसिद्धी मिळवूनही पाय जमिनीवर रोवून आहे. तर भाऊची लेक मृण्मयी कदमही (Mrunmayee Kadam) आजकाल चर्चेत असते. फॅशन, मेकअप या लाईफस्टाईल संबंधित विषयांवर ती रील्स, व्हिडिओ बनवते. नुकतंच तिला डस्की स्किन टोनवरुन प्रश्न विचारण्यात आला.
मृण्मयी कदम भाऊ कदमची लेक आहे. अनेकदा ती 'चला हवा येऊ द्या' शोच्या सेटवर येते. रणवीर सिंगसोबतच इतरही सेलिब्रिटींसोबत तिने फोटो पोस्ट केले आहेत. नुकतंच मृण्मयीने एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी तिला 'डस्की स्किन टोनमुळे फॅशन इंडस्ट्रीत काम करताना काही अडचण आली का?' असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तिने रोखठोक उत्तर दिले.
"हा विचार माझ्या डोक्यात कधी आला नाही. कारण मी अशा कुटुंबात वाढली आहे जिथे स्किन टोनवरुन वेगळी वागणूक दिली जात नाही. आमच्या घरात तर सगळ्यांचाच स्किन कलर असाच आहे. पण याने काय फरक पडतो. मी यु्ट्यूब सुरु केलं तेव्हा माझ्या डोक्यात असा विचार कधीच आला नाही. त्यात इतका काय विचार करायचा आणि लोकांना का इतका फरक पडतो मला समजतच नाही. मला आत्मविश्वास कुठून आला असं अनेकांनी मला विचारलं. हेच तुम्ही एखाद्या गोऱ्या मुलीला विचाराल का?
मृण्मयी सध्या तिच्या युट्यूब चॅनलवर लक्ष देत आहे. आतापर्यंत तिचे 42 हजार सबस्क्रायबर्स झाले आहेत. अभिनय क्षेत्रात न जाता ती वेगळ्या क्षेत्रात नशीब आजमावत आहे.