Mahabharat Bheem Pravin Kumar Death : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाच्या दु:खातून देश सावरला नसताना आज मनोरंजन विश्वाला आणखी एक मोठा धक्का बसला. बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ (Mahabharat) या अभूतपूर्व गाजलेल्या मालिकेत भीमची भूमिका साकारणारे अभिनेते प्रवीण कुमार सोबती (Praveen Kumar Sobti) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. पंजाबचे असलेल्या प्रवीण कुमार यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये भूमिका केली होती.
‘महाभारत’ ही पौराणिक टीव्ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली. दूरदर्शनवरील या मालिकेने अनेक पिढ्यांना आकर्षित केलं. पहिल्या लॉकडाऊन काळात ही मालिका पुनर्प्रक्षेपित करण्यात आली आणि या मालिकेतील कलाकार पुन्हा प्रकाशझोतात आले. या मालिकेने प्रत्येक कलाकाराला एक खास ओळख दिली होती. ही ओळख आजही कायम आहे. अभिनेता प्रवीण कुमार सोबती यांनी या मालिकेत भीमची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिकाही प्रचंड लोकप्रिय झाली होती. या मालिकेचं नाव काढताच आजही प्रत्येक व्यक्तीच्या समोर गदाधारी भीम उभा राहतो, हे या प्रवीण कुमार यांनी साकारलेल्या भूमिकेचं यश आहे. पण आता प्रेक्षकांचा हा लाडका भीम आपल्यात नाहीये.
ऑलिम्पिकमध्येकेलं भारताचे प्रतिनिधित्व प्रवीणकुमार सोबती यांनी दोनदा ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत देशासाठी अनेक सुवर्ण आणि रौप्य पदके जिंकली होती.क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना 1967 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. क्रीडा क्षेत्रातील यशस्वी कारर्कीदीनंतर्र प्रवीण यांनी 70 च्या दशकाच्या उत्तरार्धात अभिनय क्षेत्रात कारकीर्द सुरू केली. त्यांची पहिली भूमिका रविकांत नागाईच दिग्दर्शित चित्रपटात होती, ज्यात त्यांच्या वाट्याला एकही संवाद नव्हते. 1981 मध्ये आलेल्या ‘रक्षा’ चित्रपटात प्रवीण यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. अमिताभ बच्चन यांच्या ‘शहेनशाह’ चित्रपटात त्यांनी ‘मुख्तार सिंग’ची अफलातून भूमिका साकारली होती.
करिश्मा कुदरत का, युद्ध, जबरदस्त, सिंहासन,खुदगर्ज, लोहा, मोहब्बत के दुश्मन, इलाका आणि इतर अनेक चित्रपटांत त्यांनी भूमिका साकारल्या आहे. पण त्यांना खरी लोकप्रियता मिळाली ती बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेने.
राजकारणातही आजमावलं नशीब2013 मध्ये प्रवीण यांनी राजकारणात करिअर करण्याचा प्रयत्न केला आणि वजीरपूर मतदारसंघातून आम आदमी पार्टीच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली, परंतु त्यांचा पराभव झाला. नंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. 2021 मध्ये पंजाब सरकारकडून पेन्शन न मिळाल्याने प्रवीण यांनी नाराजी व्यक्त केली होती.