लाइव्ह कार्यक्रमादरम्यान भोजपुरी अभिनेत्री आणि गायिका अक्षरा सिंहसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका इव्हेंटदरम्यान अश्लील इशारे आणि हावभाव करणाऱ्या प्रेक्षकाला अभिनेत्रीने चांगलंच सुनावलं आहे. पण, हे करताना मात्र अभिनेत्रीची जीभ घसरल्याचं दिसत आहे. भर कार्यक्रमात अभिनेत्रीने त्या प्रेक्षकाला सुनावताना शिवीगाळही केली आहे.
हिंदू नववर्षानिमित्त रविवारी(३० मार्च) बिहारमधील बखोरापूरमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या इव्हेंटला अक्षरा सिंहनेदेखील हजेरी लावली होती. अक्षरा स्टेजवर गात असताना तिच्याकडे पाहून प्रेक्षकांमधील काहींनी अश्लील हावभाव केले. ते पाहताच अभिनेत्री भडकली. तिने परफॉर्मन्स मध्येच थांबवून त्यांना सुनावल्याचं व्हिडिओत दिसत आहे.
"काही लोकांच्या अंगात किडे आहेत. मी त्यांना सांगू इच्छिते तुमच्यात एवढाच दम असेल तर समोर या. अक्षरा सिंहला हलक्यात घेऊ नका. मला शेरनी उगाच बोलत नाहीत. इकडे या, माझ्यासमोर...पाठीमागून तर कुत्रे भुंकून निघून जातात. आणि हो तुमची तुलना मी कुत्र्यांशीच करणार", असं अक्षरा या व्हिडिओत म्हणत आहे. तिचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.