Join us

" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 14:00 IST

Bhushan Kadu : कोरोना काळात भूषणच्या पत्नीचे निधन झाले आणि त्यानंतर तो सिनेसृष्टीपासून दुरावला होता. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत भूषणने त्याच्या कठीण काळाबद्दल भाष्य केले.

नाटक, मालिका आणि चित्रपटातून अभिनेता भूषण कडू(Bhushan Kadu)ने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. त्याने विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली. विनोदाचे अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांना खळखळून हसवणारा भूषण मात्र पत्नीच्या निधनानंतर निराशेच्या गर्तेत गेला होता. कोरोना काळात भूषणच्या पत्नीचे निधन झाले आणि त्यानंतर तो सिनेसृष्टीपासून दुरावला होता. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत भूषणने त्याच्या कठीण काळाबद्दल भाष्य केले. या काळात त्याला चांगल्या वाईट अनुभवाबद्दल त्याने खुलासा केला.

एकीकडे भूषणची पत्नी कोरोनात गेल्यामुळे त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यातून तो सावरण्याचा प्रयत्न करत असताना त्याला काही लोकांनी जिवंत असतानाही मृत घोषित केले. तर कोणी तो परदेशात स्थायिक असल्याच्या अफवा पसरवल्या. याबद्दल भूषण कडूने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला. तो म्हणाला की, आता पुन्हा काम करायला पाहिजे. कलाकाराला त्याची कला स्वस्थ बसू देत नाही. ते देवाने नेमून दिलेलं काम आहे. त्यामुळे माझ्या प्रेक्षकांना पडलेला प्रश्न असेल किंवा मग माझ्या मित्रांना पडलेला प्रश्न असेल की सध्या भूषण काय करतोय, कुठे आहे काय चाललंय. 

तो पुढे म्हणाला की, काहींनी तर माझे निधन झाल्याचे घोषित केले होते. की तो आता या जगात नाहीये. त्याला पण कोरोना झाला आणि त्याच्यामध्ये तो पण गेला. तर काहींनी सांगितलं की तो भारतात राहतच नाही. तो भारत सोडून परदेशात गेला. असे खूप गॉसिप्स आणि अफवा माझ्याबद्दल पसरविण्यात आल्या.

म्हटल्याप्रमाणे काही चर्चा चांगल्या होत्या तर काही वाईट. बोलण्याऱ्यांची हजार तोंडं असतात. त्यामुळे प्रत्येकाचं तोंड धरून ठेवू शकत नाही, असेही तो म्हणाला.

 

टॅग्स :भूषण कडु