Join us

"माझ्या मराठा बांधवांनो..." जालना लाठीचार्ज प्रकरणावर किरण मानेंची फेसबुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2023 12:41 PM

किरण मानेंनी सोशल मीडियावर जालना लाठीचार्जबद्दल प्रतिक्रिया नोंदवली.

अभिनेता किरण माने हे उत्तम अभिनयासह स्पष्टवक्तेपणामुळे कायम चर्चेत येत असतात. समाजात वा इंडस्ट्रीमध्ये कोणतीही गोष्ट घडली की त्यावर ते व्यक्त होत असतात. यावेळीही त्यांनी अशीच एक पोस्ट शेअर केली आहे.  जालन्यातील सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. याप्रकरणी किरण मानेंनी सोशल मीडियावर लाठीचार्जबद्दल प्रतिक्रिया नोंदवली.

किरण मानेंनी पोस्टमध्ये काय म्हटलं?

"माझ्या मराठा बांधवांनो... थेट बोलतो... आपल्याला धर्माच्या नांवावर भडकवणारेच आज आपल्या पाठीत खंजीर खुपसत हायेत. सावध होऊया. खरा शत्रू ओळखूया. आता तरी आपला खरा धर्म ओळखूया. धर्म संकटात आला की आपली मदत घेतली जाते आणि आपल्यावर हल्ला झाला की 'एका जातीवर' झाला असं समजलं जातं. आधी शेतकर्‍यांवर, मग वारकर्‍यांवर आनि आता या आंदोलनावर आघात झालाय. मराठा आरक्षण कुनाला नको हाय, ते शोधायला लै लांब नाय जावं लागनार. फक्त आपल्या धडावर आपलं डोकं असायला पायजे".

" मनोज जरांगे पाटील...तुमच्याबद्दल काय बोलू? या भाकड काळात तुमी जे बोलताय ते बोलायला जिगरा लागतो ! परवा आमच्या आयाबहिनींचं रक्त पाहिल्यापास्नं आमचंबी काळीज तुमच्याइतकंच तुटतंय... रक्त सळसळायला लागलंय... हात शिवशिवताहेत. आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत. फक्त सावध रहा. शत्रू कुटिल कारस्थानी आहे. सहकार्‍यांवर लक्ष ठेवा. आंदोलनात छुपी घुसखोरी करून आंदोलन हायजॅक करण्याचा इतिहास ताजा आहे. आता सावधपणे, भान ठेवून शेवटचा घाव घालूया सगळे मिळून. आता रस्त्यावर उतरायची वेळ आलीय".

"डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रचंड इच्छा होती. ते म्हणालेही होते की 'एक दिवस मराठा समाजाला आरक्षणाची गरज भासेल, पण त्यावेळी ते द्यायला मी नसेन !' अशा पोस्टवरनं जे कायम मला ट्रोल करतात. त्यांना खरंतर मी एका केसाचीबी किंमत देत नाय. पन आज एक सांगतो, मी शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा पाईक हाय. कुनाच्या बापाला घाबरत नाय. काम काढून घेनन्याफिन्याला भेत नाय. मनगटाच्या बळावर मातीतनं पिकवून खानार्‍या शेतकर्‍याची औलाद हाय. कुनापुढं लाचार होनार नाय. समाजासाठी, गोरगरीबांसाठी आनि माझ्या शेतकर्‍यांसाठी वाट्टंल ती किंमत मोजून मी बोलनार. जीवात जीव असेपर्यन्त बोलत र्‍हानार".

आंदोलनकर्त्या भावाबहिनींनो, तुमच्या रक्ताच्या सांडलेल्या एकेका थेंबाची किंमत वसूल झाली पायजे... न्याय मिळालाच पायजे.जय शिवराय.  

दरम्यान, जालन्यात अंतरावाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काही दिवसांपासून उपोषण सुरू होते. २९ ऑगस्टपासून मराठा मार्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह १० जण आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले होते. १ सप्टेंबर रोजी पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी विरोध झाल्यानंतर लाठीचार्ज करण्यात आला. तसेच पोलिसांकडून हवेतगोळीबार करण्यात आला.  शांततेत सुरू झालेल्या या उपोषणाला हिंसक वळण मिळाल्याचे चित्र आहे. या प्रकारानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत

 

टॅग्स :किरण मानेमराठा आरक्षणसिनेमामराठी अभिनेता