गतवर्षी संपूर्ण महाराष्ट्राला ज्या कार्यक्रमाने वेड लावले, ज्याची चर्चा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झाली असा प्रेक्षकांचा आवडता रिऍलिटी शो म्हणजेच बिग बॉस मराठी. या कार्यक्रमाचा सिझन दुसरा कलर्स मराठीवर सुरु होत आहे. याच निमित्ताने या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाला सुपरहिट बनवणारे सदस्य एकदम कडकच्या मंचावर आले आहेत. बिग बॉसच्या घरातील अनेक आठवणींना या कार्यक्रमामध्ये उजाळा मिळाला आहे, तर प्रेक्षकांना काही आरोप – प्रत्यारोप, वाद – विवाद देखील बघायला मिळाले. याचबरोबर रेशम टिपणीस, बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वामध्ये ज्यांची मैत्री खूप चर्चेत राहिली असे मेघा धडे, सई लोकूर आणि पुष्कर जोग, शर्मिष्ठा राउत आणि नंदकिशोर चौघुले, विनीत भोंडे, स्मिता गोंदकर – सुशांत शेलार, यांचे एकदम कडक परफॉर्मन्स प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. या विशेष भागाचे सूत्रसंचालन अष्टपैलू अभिनेता जितेंद्र जोशी करताना दिसतोय.
सध्या बिग बॉस मराठीच्या प्रोमोजबद्दल प्रेक्षकांमध्ये बरीच चर्चा आहे. या प्रोमोजवरून प्रेक्षकांनी कार्यक्रमामध्ये कोणत्या क्षेत्रातील सदस्य असतील याबद्दल तर्क लावायला सुरुवात केली आहे. याचसंदर्भात जितेंद्र जोशी यांनी अनिल थत्तेना विचारले जर राजकारण्यांचं बिग बॉस बनवलं तर कोणी कोणी घरात जावं ? ऋतुजाला देखील विचारले बीग बॉसमुळे लोकांचं तुझ्याबद्दल मत बदललं का ? तसेच अनिल थत्तेना विचारले कोणाला सॉरी म्हणायचे आहे कोणाचे आभार मानायचे आहेत ? असे प्रश्न विचारले आहेत.