कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉसच्या सीझन २ मधील सर्वाधिक चर्चेत असलेले स्पर्धेक अभिजीत बिचुकले बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले आहेत. त्यांना सातारा पोलिसांनी आरे पोलिसांच्या मदतीनं अटक करण्यात आलीय.
आरे पोलिसांच्या मदतीने सातारा पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अभिजित बिचुकले यांना गोरेगाव फिल्मसिटी येथील बिग बॉसच्या सेटवरून अटक केली आहे. आज सकाळी ही कारवाई करण्यात आली असून साताऱ्यात भा. दं. वि. कलम १३८ अन्वये गुन्हा दाखल होता असून ३५ हजारांचा चेक बाउंस झाल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक यांचे पत्र आणि कोर्टाचे नॉन बेलेबल वॉरंट घेऊन सातारा पोलिसांचे पथक आले होते. फिल्म सिटी परिसर आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने त्यांना मदत केली असून सकाळी अटक करण्यात आली असल्याची माहिती आरे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी हिरेमठ यांनी लोकमतशी बोलताना दिली.
या आठवड्यात बिग बॉसच्या घरातील एक टास्क चांगलाच वादग्रस्त ठरला होता. घरातील कामातील सहभाग आणि उत्तम कामगिरी या निकषांवर १ ते १० क्रमांकावर उभे राहण्याचा टास्क बिग बॉसने स्पर्धकांना दिला होता. या टास्कदरम्यान अभिजीत बिचुकले आणि सहस्पर्धक रूपाली भोसले यांच्यात प्रचंड वादावादी झाली होती.
अभिजीत बिचुकले खोटे बोलतात, इतरांना फसवतात, असा आरोप रूपालीने केला होता. बिचुकलेंनी हे आरोप फेटाळताच, मुलीची शपथ घ्या, असे रूपाली म्हणाली होती. ते ऐकल्यानंतर बिचुकलेंचा संताप अनावर झाला होता आणि त्यांनी रूपालीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती. केवळ इतकेच नाही तर रूपालीच्या घटस्फोटाचा उल्लेखही केला होता. बिचुकले इतके संतापात होते की, त्यांनी शिव्यांचा भडीमार केला. बिग बॉसला त्यांचा हा आवाज म्यूट करावा लागला होता.
या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या माजी नगरसेविका रितू तावडे यांनी बिचुकलेंना बिग बॉसच्या घराबाहेर हाकला, अशी मागणी केली होती.