ठळक मुद्देमाझे बाबा ज्यादिवशी गेले, त्यादिवशी माझा एका अवॉर्ड फंक्शनमध्ये परफॉर्मन्स होता. आय रिमेम्बर ते आयसीयूमध्ये होते... लास्ट स्टेजवर, मी त्यांना सांगितलं की, मी तुमच्याबरोबर राहणार... पण ते मला म्हणाले की, 'द शो मस्ट गो ऑन!'
'बिग बॉस मराठी २' या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत असून या घरातील सगळेच स्पर्धक आता प्रेक्षकांचे प्रचंड आवडते बनले आहेत. या घरातील स्पर्धकांमध्ये देखील आता खूप चांगली मैत्री झाली असून ते एकमेकांच्या आयुष्यातील गोष्टी रिकाम्या वेळात शेअर करत आहेत.
बिग बॉस मराठी २ मधील स्पर्धक एकमेकांसोबतच नव्हे तर कॅमेऱ्यासमोर देखील प्रांजळपणे त्यांच्या कथा शेअर करत आहेत. वूटच्या 'अनसीन अनदेखा'च्या नवीन क्लिपमध्ये किशोरी शहाणे, विद्याधर जोशी ऊर्फ बाप्पा आणि सुरेखा पुणेकर हे तिघे गप्पा मारताना दिसणार आहेत. हे तिघे आपल्या आयुष्यातील भावनिक प्रवासाविषयी एकमेकांना सांगणार आहेत.
गप्पा मारताना किशोरी यांनी सांगितले की, ''माझे बाबा ज्यादिवशी गेले, त्यादिवशी माझा एका अवॉर्ड फंक्शनमध्ये परफॉर्मन्स होता. आय रिमेम्बर ते आयसीयूमध्ये होते... लास्ट स्टेजवर, मी त्यांना सांगितलं की, मी तुमच्याबरोबर राहणार... पण ते मला म्हणाले की, 'द शो मस्ट गो ऑन!' तू जायचं आणि परफॉर्मन्स सादर करायचा. मी त्यांचं ऐकलं आणि मी त्यादिवशी परफॉर्मन्स सादर केला!''
किशोरी शहाणे यांनी सांगितलेली ही गोष्ट ऐकून बाप्पा आणि सुरेखा पुणेकर थक्क झाले. तू केलेल्या गोष्टीचा आम्हाला अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर किशोरी यांनी पुढे सांगितले की, ''सगळ्यांना वाटलं होतं माझा तो परफॉर्मन्स कॅन्सल होईल... पण माझ्या बाबांनी मला सांगितल्यामुळे मी परफॉर्मन्स सादर केला. सचिन पिळगावकर यांना त्या अवॉर्ड फंक्शनमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी मला स्टेजवर बोलावून माझे कौतुक केले होते. केवळ त्यांनीच नव्हे तर महेश मांजरेकर यांनी देखील मला सॅल्युट केला होता. आता माझे बाबा जाऊन दोन वर्षं झाले... बट आय स्टिल रिमेम्बर दॅट डे.''
किशोरी शहाणे यांच्या आयुष्यातील ही घटना ऐकून बाप्पा आणि सुरेखा दोघेही भावुक झाले होते. त्यांनी देखील किशोरी यांचे त्यांच्या धीरासाठी कौतुक केले.