'बिग बॉस मराठी 3'च्या (bigg boss marathi 3) माध्यमातून घराघरात पोहोचलेली जोडी म्हणजे विशाल निकम (vishal nikam) आणि विकास पाटील (vikas patil). या शोमध्ये एकत्र भावांप्रमाणे राहिलेल्या या दोघांची मैत्री शो संपल्यानंतरही कायम आहे. त्यामुळे अनेकदा हे दोघं एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. बिग बॉस संपल्यानंतर या दोघांनीही देवदर्शन केलं होतं. तसंच त्यानंतरही ते अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र झळकले. यावेळी व्हायरल झालेल्या त्यांच्या फोटोवरुन त्यांची मैत्री पाहता आली. यामध्येच आता विशालने एक पोस्ट शेअर करत त्यांच्या मैत्रीला राम-लक्ष्मणाची उपमा दिली आहे.
अलिकडेच विशाल आणि विकास यांनी एकत्र हनुमान जयंती साजरी केली. यावेळचे फोटो विशालने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. सोबतच त्याला साजेसं कॅप्शन दिलं आहे.
"आज आम्ही दोघं बऱ्याच दिवसांनी भेटलो ते ही हनुमान जयंतीला त्यामुळे हनुमंताचे आशिर्वाद घेतले आहेत की, आमची मैत्री राम-लक्ष्मणासारखी आयुष्यभर राहावी हीच बजरंगबलीच्या चरणी प्रार्थना, असं कॅप्शन विशालने या फोटोला दिलं आहे.
दरम्यान, बिग बॉसच्या घरात असताना विकास आणि विशालची मैत्री प्रचंड गाजली होती. या दोघांनी ग्रँड फिनालेच्या दिवशी 'ही दोस्ती तुटायची नाय' या गाण्यावरही अफलातून डान्स केल्याचं पाहायला मिळालं होतं.