‘बिग बॉस मराठी 4’च्या (Bigg Boss Marathi 4:) घरात सध्या रोज नवा राडा पाहायला मिळतोय. एका बाजूला किरण माने व विकास आणि दुसऱ्या बाजूला मेघा घाडगे आणि अपूर्वा नेमळेकर असा राडा नुकताच पाहायला मिळाला. या भांडणात अपूर्वा किरण मानेंवर इतकी भडकली की, ‘ए किरण माने...,’ असं ओरडत तिने अख्खं घर डोक्यावर घेतलं. अपूर्वाने किरण मानेंचा एकेरी उल्लेख करणं अनेकांना आवडलं नाही. अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी याच पार्श्वभूमीवर एक पोस्ट शेअर केली आहे. तुम्हाला ठाऊक असेलच की, ‘बिग बॉस मराठी’च्या मागच्या सीझनमध्ये सुरेखा कुडची (Surekha Kudachi ) स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या होत्या. सध्या त्या प्रेक्षक म्हणून ‘बिग बॉस मराठी 4’ एन्जॉय करत आहेत. पण शोमधली एक गोष्ट त्यांना खटकली आहे.
सुरेखा कुडची यांची पोस्ट?‘आज बिग बॉस मराठीचा एपिसोड पाहिला. नवोदित कलाकार एखाद्या ज्येष्ठ कलाकाराला अरे तुरे करून बोलतो हे ऐकून वाईट वाटलं. निदान वयाचा तरी मान ठेवून बोलावं...,’ असं सुरेखा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्येम्हटलं आहे. सुरेखा यांनी ज्येष्ठ कलाकाराला अरे तुरे करणाऱ्या स्पर्धकाच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. पण त्यांचा इशारा अपूर्वा नेमळेकरकडे आहे, हे समजायला चाहत्यांना वेळ लागला नाही. अनेकांनी सुरेखा यांच्या पोस्टवर दुजोरा देत, या निमित्ताने अपूर्वावर टीका केली आहे. तर काहींनी वयाचा आणि मानाचा काहीही संबंध नाही, म्हणत त्यांच्या म्हणण्यावर असहमती दर्शवली आहे.
तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे. अपूर्वा नेमळेकरला अजिबात शिस्त नाही, असं एका युजरने म्हटलं आहे. वयाचा आणि मानाचा काहीही संबंध नाही. स्वत: नीट वागायचं मग लोकपण नीट वागतील, अशी कमेंट अन्य एका युजरने केली आहे.