मुंबई – महिलांना मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी आंदोलन करणाऱ्या तृप्ती देसाई सध्या वेगळ्याच कारणानं चर्चेत आहेत. तृप्ती देसाई या बिग बॉस मराठी सिजन ३ च्या स्पर्धक आहेत. बिग बॉसमध्ये आल्यापासून तृप्ती देसाई त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा करत आहेत. महिलांच्या न्यायहक्कासाठी त्या कशा पुढे आल्या? महिलांसाठी काम करण्याची प्रेरणा त्यांना कशी मिळाली? याचा खुलासा त्यांनी या कार्यक्रमात केला आहे.
अलीकडेच बिग बॉस मराठी सिजन ३(Big Boss Marathi 3) सुरु झालं आहे. यात तृप्ती देसाई(Trupti Desai) यांनीही सहभाग घेतला आहे. एरव्ही महिलांच्या आंदोलनासाठी कायम चर्चेत असणाऱ्या तृप्ती देसाई यांची स्पर्धेतील एन्ट्री अनेकांसाठी धक्कादायक होती. या कार्यक्रमातील एका एपिसोडमध्ये तृप्ती देसाई म्हणाल्या की, मी देवाला खूप मानते. माझी देवावर श्रद्धा आहे. एकेदिवशी मी आणि माझा नवरा जेवायला बसलो होते तेव्हा बातमी आली की एका मंदिरात गेल्यानंतर अल्पवयीन मुलगी नकळत देवाच्या चौथऱ्यावर पोहचली म्हणून देवाला अभिषेक घालून त्याला पवित्र करण्यात आले. तेव्हा मला खूप वाईट वाटले. माझ्या डोळ्यात पाणी आलं तेव्हा माझ्या नवऱ्याने मला सांगितलं तू महिलांसाठी लढायला हवं. त्याने मला प्रेरणा दिली. प्रवाहाच्या विरोधात जाऊन लढण्याची उमेद मला माझ्या नवऱ्यानं दिली. त्यानंतर मी यात उतरले असल्याचं तृप्ती देसाईंनी सांगितलं.
त्यानंतर केरळच्या शबरीमाला मंदिराचा विषय खूप गंभीर होत चालला होता. या मंदिरात महिलांना प्रवेशबंदी असल्याने मी त्याविरोधात आंदोलन छेडलं. शबरीमाला प्रकरणावरुन मला अनेक धमक्या येत होत्या. जीवे मारण्याचे मेसेज येत होते. तरीही मी केरळमध्ये जाण्यावर ठाम होते. मी केरळला जाणार आहे हे समजल्यावर माझे वडिलांना अश्रू अनावर झाले. ते मला केरळला जाऊ नकोस म्हणून विनवणी करत होते. परंतु मी केरळला जाणार आहे. कदाचित ही आपली शेवटची भेट ठरू शकते असं म्हंटल्यावर ते ढसाढसा रडले. तेव्हा मी घरातून बाहेर पडताना माझ्या नवऱ्याने माझी आरती ओवाळली आणि तू लढाई जिंकशील असं म्हणाले असल्याचं तृप्ती देसाई यांनी सांगितले.
कोण आहेत तृप्ती देसाई?
महिलांना मंदिर प्रवेशासाठी आंदोलन उभारणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून तृप्ती देसाई यांची ओळख आहे. शनी मंदिर, इंदुरीकर महाराज यांचे महिलांबद्दल विधान आणि शबरीमाला प्रकरणावर तृप्ती देसाई यांनी रोखठोक मतं मांडली होती. प्रवाहाच्या विरोधात जाऊन महिलांसाठी मंदिर प्रवेशाचा लढा तृप्ती देसाईंनी कायम ठेवला.