Bigg Boss 10: विजेता मनवीर गुजरने सोडले मौन,म्हणाला आहे मी विवाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2017 12:21 PM
बिग बॉसच्या घरात मनवीर गुर्जरने शांत आणि संयमी वागणुकीने सा-यांची मनं जिंकत सीझनचे विजेतेपद पटकावलं. वादाशी मनवीरचा अपवादाने सामना ...
बिग बॉसच्या घरात मनवीर गुर्जरने शांत आणि संयमी वागणुकीने सा-यांची मनं जिंकत सीझनचे विजेतेपद पटकावलं. वादाशी मनवीरचा अपवादाने सामना झाला. मात्र जितका वादग्रस्त तो त्या घरात ठरला नाही त्याहून कित्येक पटीने अधिक वादग्रस्त तो घरातून विजेता म्हणून बाहेर आल्यावर ठरला आहे. मनवीर वादात सापडला तो त्याच्या लग्नाच्या बातमीमुळे. मनवीर विवाहित असल्याचे समोर आले. इतकंच नाही तर त्याची तीन वर्षाची मुलगी असल्याचंही उघड झाले. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला असून त्याला फॅन्सकडून संतापाचा सामना करावा लागत होता. या सगळ्या वादावर मनवीरनं आपले मौन सोडले आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करुन त्याने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या व्हिडिओमध्ये विवाह झाल्याचं मनवीरने मान्य केले आहे. 'विवाहाची गोष्ट जाणीवपूर्वक इतरांपासून आपण लपविलेली नाही. माझी अशी कोणतीही स्ट्रॅटजी नव्हती.' तो पुढे म्हणतो की, 'मी कधीही माझा विवाह लपवण्याचा प्रयत्न केला नाही. 2014मध्ये माझे कुटुंब आणि काही भावनिक कारणांमुळे मला विवाह करावा लागला. मात्र 4-5 महिन्यांतच आमच्या दोघांच्या नात्यांत फार तणाव निर्माण झाला. त्यामुळे आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला. बिग बॉसमध्ये विवाहाला लपविण्याबद्दल माझी कोणतीही स्ट्रॅटजी नव्हती. माझा विवाह लपवून बिग बॉसमध्ये याचा फायदा उठवण्याचा मी कधीही प्रयत्न केला नाही. तसेच शोमध्ये कुणाला फसवण्याचा मी विचार केला नाही किंवा तसे प्रयत्नही कधी केले नाही.काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये मनवीर त्याच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत विवाहाच्या वेशभुषेत घोडीवर चढताना दिसत आहे. त्याला तीन वर्षांची मुलगी असल्याचे वृत्त यानंतर आले होते. माध्यामांमध्ये हे वृत्त येताच मनवीरच्या फॅन्सनी त्याच्यावर आरोप केला की, मनवीरने आपला विवाह लपवून ठेवला आणि असे करुन त्याने आमचा विश्वासघात केला आहे. मात्र 'बिग बॉस 10' सीझनच्या चौथ्या दिवशीचा एपिसोड 'Day 4: Om Baba Gets Jailed' मध्ये मनवीरने व्हिजे बानीला आपण विवाहीत असल्याचे सांगितले होते. मनवीर म्हणाला होता, 'वयाच्या 22व्या वर्षीच त्याला लग्नासाठी उभे केले गेले होते.' यावर बानीने विचारले होते की, 'बिग बॉसमध्ये येण्याबद्दल तुझ्या पत्नीची काय प्रतिक्रिया होती?' तेव्हा मनवीर म्हणाला होता, 'पत्नी आणि आई वगळता इतर कोणालाही मी बिग बॉसमध्ये येण्याबद्दल सांगितलेले नाही.' मनवीर पुढे म्हणाला होता, 'त्याची एक 3 वर्षांची मुलगी आहे. तिचे नाव विविशा आहे.' मनवीरवर उत्तर प्रदेश पोलीसात गुन्हासुद्धा दाखल आहे. मनवीरचे कुटुंब आणि त्याच्या काही मित्रांनी नोएडाच्या सेक्टर 46मधील पार्कमध्ये एका सोहळयाचे आयोजन केले होते. या सोहळ्यासाठी नोएडा पोलिसांनी 40 वाहनांची परवानगी दिली होती. मात्र मनवीरचे कुटुंबीय व त्याच्या मित्रांनी यापेक्षा 25 पटीने जास्त वाहने तिथे आणली. पार्कजवळ 1000पेक्षा जास्त वाहनांची गर्दी झाल्यामुळे तेथील नागरिकांना याचा फार त्रास सहन करावा लागला. शेवटी लोकांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.सध्या मनवीर गुर्जर याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी मनवीर तापाने फणफणला होता. आता मनवीरच्या आजारपणाचे आणि तापाचे कारण हाच वाद तर नाही ना. कारण याच वादामुळे गेल्या दिवसांपासून मनवीर तणावात असल्याचे बोलले जात होते. त्याला अशक्तपणाही जाणवत होता. या सगळ्या कारणामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.आता मनवीरची तब्येत सुधारत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. या सगळ्या घडामोडीनंतर त्याचे फॅन्स मनवीरला इतकेच सांगतील की टेन्शन मत ले भाई... जस्ट चिल्ड...