बिग बॉस १३ या वादग्रस्त हिंदी रिअॅलिटी शोचा विजेता बनल्यानंतर टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लावर बरीच टीका झाली. सोशल मीडियावर तर शो आणि हा निर्णय फिक्स्ड असल्याचा आरोप सुरू झाला. बिग बॉसचा शो स्क्रिप्टेड असल्याचीही चर्चा सुरू असताना कलर्स वाहिनीच्या एका माजी महिला कर्मचाऱ्याने ट्वीट करून सिद्धार्थच्या विजेता बनण्यामागचे गुपित सोशल मीडियावर शेअर केले आहे. या महिलेने काहीच महिन्यांपूर्वी कलर्स वाहिनीची नोकरी सोडली आहे.
कलर्स वाहिनीची एक्स कर्मचारी फेरियाने ट्वीट करून सांगितले की,‘वाहिनीच्या क्रिएटिव्ह विभागामध्ये काम करताना चांगला अनुभव आला. पण, आता मी इथून पुढे या खोटेपणाचा हिस्सा बनू शकत नाही. सिद्धार्थ शुक्लाला कमी वोट्स मिळूनही तो जिंकतो, यात नक्कीच काहीतरी चुकीचे आहे, याचा अंदाज प्रेक्षकांनाही आला होता. अशा खोट्या शोचा मी हिस्सा होऊ शकत नाही. हा शो स्क्रिप्टेड आहे. ज्यात सिद्धार्थ शुक्ला हा फिक्स्ड विनर आहे. ‘बिग बॉस १३’ची क्रिएटिव्ह आणि प्रोग्रामिंग हेड ही सिद्धार्थ शुक्लाची एक्स गर्लफ्रेंड आहे. त्यामुळे हे विजेतेपद साहजिकच सिद्धार्थला मिळाले.’ या ट्वीटवर अनेक लाईक्स आणि कमेंटस मिळाले असून सध्या याच ट्वीटची सगळीकडे चर्चा आहे.
हे ट्वीट सगळीकडे गाजत असतानाच आता कलर्स वाहिनीने या महिला कर्मचारीविषयी एक खळबळजनक खुलासा केला आहे. वाहिनीने सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे की, फेरिया ही आमच्या वाहिनीची कर्मचारी नसून तिने वाहिनीवर केलेले सगळे आरोप चुकीचे आणि बिनबुडाचे आहेत. कोणत्याही चुकीच्या माहितीवर लोकांनी विश्वास ठेवू नये अशी आम्ही लोकांना विनंती करत आहोत.
कलर्स वाहिनीच्या या खुलासानंतर फेरियाने आणखी एक ट्वीट केले आहे. त्यात तिने म्हटले आहे की, कंट्रोल रूमचा व्हिडिओ फेक आहे का? सिद्धार्थचे कॉन्ट्रॅक्ट लोकांना का दाखवले जात नाही? बिग बॉस फिनालेला मिळालेल्या मतांचे ऑडिट तुम्ही का करत नाही? आता तरी लोकांना मूर्ख बनवणे सोडा...