‘बिग बॉस 13’ हा रिअॅलिटी शो संपला. पण या शोची स्पर्धक माहिरा शर्माची चर्चा संपलेली नाही. सर्वप्रथम ‘बिग बॉस 13’ फिनालेवेळी घातलेल्या ड्रेसमुळे माहिरा ट्रोल झाली. फिनालेसाठी माहिराने आलिया भटची ड्रेसिंग स्टाईल कॉपी केली होती. आता दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमुळे ती चर्चेत आली आहे. होय, दादासाहेब फाळके पुरस्काराचे बनावट प्रशस्तीपत्र बनवल्याचा आरोप माहिरावर ठेवण्यात आला आहे. हा आरोप अन्य कुणी नाही तर दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या अधिकृत टीमने केला आहे.
अलीकडे मुंबईत दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा 2020 पार पडला. या सोहळ्याला बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. या सोहळ्यानंतर माहिराने इन्स्टाग्रामवर या पुरस्कारस्वरूप देण्यात आलेल्या प्रशस्तीपत्राचा फोटो शेअर केला होता. ‘मोस्ट फॅशनेबल कंटेस्टंट ऑफ बिग बॉस 13’साठी हा पुरस्कार मिळाल्याचा दावा माहिराने केला होता. आता दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या अधिकृत टीमने माहिराचा हा दावा खोटा ठरवत, तिने शेअर केलेले प्रशस्तीपत्र बनावट असल्याचा प्रतिदावा केला आहे. आमच्या कुठल्याही टीम मेंबरने माहिराला हे प्रशस्तीपत्र दिलेले नाही. याचा अर्थ माहिराने बनावट प्रशस्तीपत्र बनवले, असे या टीमने म्हटले आहे.
माहिराचे हे कृत्य गैर असल्याचे सांगत टीमने तिच्याविरोधात एक ताकिदपत्र जारी केले आहे. या कृत्यासाठी माहिराने दोन दिवसांच्या आत माफी मागावी. अन्यथा तिच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असे या ताकिद पत्रात म्हटले आहे. माहिराने अद्याप यावर कुठलेही स्पष्टीकरण दिलेले नाही.