bigg boss 17 सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सध्या या शोची सोशल मीडियावर चर्चा रंगत आहे. आतापर्यंत या कार्यक्रमाचे 16 पर्व पार पडले. मात्र, सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांच्या पर्वाची म्हणजेच 'बिग बॉस 13'ची आजही नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगते. हे पर्व त्याकाळी तुफान गाजलं होतं. सध्या या पर्वातील अभिनेत्री हिमांशी खुराना हिची चर्चा रंगली आहे. हिमांशीने अभिनेता आणि बिग बॉसचा होस्ट सलमान खान याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
'ई टाइम्स'च्या वृत्तानुसार, हिमांशीने नुकतीच एका युट्यूब पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने सलमान खानवर गंभीर आरोप केले आहेत. "मी अलिकडेच माझ्या आयुष्यातील काही कठीण प्रसंगातून सावरले आहे. बिग बॉस १३ नंतर मला प्रचंड मानसिक ताणाला सामोरं जावं लागलं. माझ्या आयुष्यात सगळं काही होतं. पण, तरी मला काही तरी कमी असल्याचं जाणवत होतं. मी कोणत्याच गोष्टीचा नीट आनंद घेऊ शकत नव्हते. मला वाटत होतं काही तरी गडबड आहे आणि मी हे माझ्या टीमला सांगितलं पाहिजे की, मी जीवनात कोणत्याच गोष्टीचा आनंद घेऊ शकत नाहीये. त्यानंतर मी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतली. त्यांच्यासमोर मी खूप रडले. मी ज्या गोष्टी कधी केल्याच नाहीत त्या गोष्टींचे आरोपही माझ्यावर करण्यात आले. मी कोणत्याही गोष्टींवर चर्चा करु इच्छित नाही. कारण, मग पुन्ही मी सहानभूती मिळवण्यासाठी प्रयत्न करतीये असं म्हणून त्यावर नवीन चर्चा केली जाईल. कारण, माझ्याकडे कोणताही पुरावा नाही. मग माझं रिलेशनशीप असतो, बिग बॉसमधील एन्ट्री असो किंवा मग अजून कोणताही मुद्दा. माझ्याकडे माझी बाजू मांडणारा कोणताही पुरावा नाही", असं हिमांशी म्हणाली.
पुढे ती म्हणते, "शोमधील माझा प्रत्येक क्षण एडीट करुन दाखवला गेला. त्याला ब्रेकिंग न्यूज सारखं दाखवलं गेलं. त्यामुळे सगळ्या गोष्टींचा अर्थच बदलून गेला. मी जेव्हा बिग बॉसमध्ये एन्ट्री केली त्यावेळी मला खूप लोकांनी येऊन सांगितलं की मी एका चेटकीणीसारखी दिसते. मी खूप नॉर्मल होते सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहत होते. तरी सुद्धा लोक माझ्या बोलण्याच्या शैलीवरुन माझी मस्करी करायचे. ज्यावेळी मी सलमान खान यांच्याशी काही मुद्द्यावर बोलत होते. त्यावेळी शोमध्ये असं दाखवण्यात आलं की, मी घरातील लोकांमध्ये भांडण लावायचा प्रयत्न करते. जसं की मी चुगल्या करते. ज्यावेळी मी बोलायचा प्रयत्न केला सलमान खान यांनी मला थांबवलं. मी त्यावेळी यासाठी शांत राहिले कारण माझ्यासमोर एक सीनिअर आर्टिस्ट होता. यामुळे मी गप्प नव्हते की, मी चुकीची होते. माझ्या आईवडिलांची एक शिकवण आहे. ज्यावेळी मोठे बोलत असतील त्यावेळी त्यांचं ऐकून घ्यायचं. त्यामुळे मी सलमान यांचा मान ठेवला. पण, शोमध्ये असं दाखवण्यात आलं की समोरचा योग्य आहे. मात्र, त्यांच्याकडे पॉवर होती आणि ते कोणाचंही आयुष्य सहज उद्धवस्त करतायेत यांची त्यांना जाणीवच होत नव्हती."