ठळक मुद्देभाजपा खासदार नंदकिशोर गुर्जर यांनीही प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून ‘बिग बॉस 13’ हा शो बंद करण्याची मागणी पुढे रेटली आहे.
दरवर्षी ‘बिग बॉस’ हा शो नवा वाद ओढवून घेतो. या वादांमुळे अनेकदा ‘बिग बॉस’च्या प्रसारणाची वेळ बदलावी लागली. यंदाचे ‘बिग बॉस’चे 13 वे सीझनही याला अपवाद नाही. ‘बिग बॉस 13’ सुरु होऊन उणेपुरे दोन आठवडे होत नाही तोच बोल्ड कंटेन्टमुळे हा शो बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. इतकेच काय आता करणी सेनेनेही हा शो बंद करण्याची मागणी केली आहे. पद्मावत, मणिकर्णिका आणि आर्टिकल 15 या सिनेमानंतर ‘बिग बॉस 13’ हा रिअॅलिटी शो करणी सेनेच्या रडारवर आला आहे. या शोमधील कंटेन्ट प्रचंड बोल्ड असून हा शो भारतीय संस्कृतीची पायमल्ली करणारा असल्याचे करणी सेनेने म्हटले आहे.
करणी सेनेने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहित हा शो बंद करण्याची मागणी केली आहे. ‘बिग बॉस 13 मध्ये काश्मीरी मुलाबरोबर हिंदू मुलगी बेड शेअर करीत आहे. हिंदू मुलींना आधुनिक बनवण्याच्या नावाखाली चुकीची मानसिकता पसरविली जात आहे. हिंदू मुली लग्नाच्या आधी आई बनू शकतात, असा निष्कर्ष यातून निघतो. सरकारने या मुद्यावर तातडीने निर्णय घेत, हा शो त्वरित बंद करावा, ’असे करणी सेनेने या पत्रात म्हटले आहे.यापूर्वी संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावत’ या चित्रपटावेळी करणी सेनेने अशीच आक्रमक भूमिका घेतली होती. आता बिग बॉसचे निर्माते काय निर्णय घेतात ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
भाजपा आमदारानेही लिहिले पत्र
भाजपा खासदार नंदकिशोर गुर्जर यांनीही प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून ‘बिग बॉस 13’ हा शो बंद करण्याची मागणी पुढे रेटली आहे. हा शो अश्लिल आणि भारतीय संस्कृतीला काळीमा फासणारा असल्याचे गुर्जर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.