बिग बॉसचे 13 वे सीझन संपले. पण हे काय? 13 वे सीझन संपताच 14 व्या सीझनची तयारी सुरू झाली. ‘बिग बॉस 13’ आत्तापर्यंतचे सर्वात यशस्वी सीझन ठरले. इतके की, अफाट लोकप्रियता बघता शो सुमारे दीड महिने पुढे रेटण्यात आला. सिद्धार्थ शुक्ला या शोचा विजेता ठरला तर आसिम रियाजला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे ‘बिग बॉस 13’च्या फिनालेमध्येच ‘बिग बॉस 14’ कधी येणार, याचे संकेतही मिळाले.
होय, ‘बिग बॉस 13’च्या फिनालेमध्ये चाहत्यांचा निरोप घेताना, ‘अब आप सबसे मुलाकात होगी ठीक सात महिने बाद....,’ असे सलमान खान म्हणाला. याचा अर्थ पुढच्या सात महिन्यानंतर म्हणजे सप्टेंबर महिन्यात ‘बिग बॉस 14’ सुरु होणार, हे स्पष्ट झाले.‘बिग बॉस’ सुरु होण्यापूर्वी सुमारे एक-दीड महिन्यांआधी स्पर्धकांचा शोध सुरु होतो. म्हणजे, जुलै-ऑगस्टदरम्यान ‘बिग बॉस 14’च्या स्पर्धकांच्या नावांची चर्चा सुरु होईल. आता या सीझनची थीम काय असेल, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ते मात्र शो आल्यावरच कळेल.
सलमान खान करणार नाही होस्ट?‘बिग बॉस ’चे 14 सीझन येण्याआधी एक चर्चा सुरु झाली आहे. ती म्हणजे सलमान खान हे सीझन होस्ट करणार नाही. पिंकविलाने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, यावेळी चॅनलने सिद्धार्थ शुक्लाला जरा जास्तच झुकते माप दिल्याचे सलमानचे मत होते. सिद्धार्थ ‘बिग बॉस 13’ विजेता बनणार हे कळल्यावर सलमान म्हणे चांगलाच भडकला होता. त्याच्या रागामुळे शोला विलंब झाला आणि विनरच्या नावाची घोषणा रात्री 12 नंतर झाली. या पार्श्वभूमीवर यापुढे सीझन होस्ट करणार नसल्याचे सलमानने मेकर्सला सांगितल्याचे कळते. खरे तर सलमान हा शो सोडण्याच्या चर्चा यापूर्वीही झाल्यात. पण आता मात्र सलमानचा इरादा पक्का असल्याचे कळतेय. शोमध्ये स्पर्धकांचे खासगी आयुष्याची चर्चा घडवून आणणे हे सलमानला अजिबात आवडत नसल्याचेही कळतेय.