‘बिग बॉस 13’च्या फिनालेला अगदी काही दिवस उरले आहेत. या सीझनचा विजेता कोण होणार, हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. अशाच विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जाणा-या सिद्धार्थ शुक्लाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत मुंबई पोलिस सिद्धार्थला अटक करताना आणि पकडून पोलिस व्हॅनमध्ये बसवताना दिसत आहेत. या व्हिडीओमुळे सिद्धार्थच्या चाहत्यांमध्ये एकच खळबळ माजली आहे. सिद्धार्थने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आणि सुरुवातीपासूनच तो चर्चेत आला. त्याचा राग, रागाच्या भरात केलेली मारामारी असे सगळे एपिसोड गाजलेत. सिद्धार्थचा पारा अचानक इतका चढायचा की, बिग बॉसचा होस्ट सलमान खान याने त्याला रागा कमी करण्याचा फॉर्म्युला सांगितला होता. त्यामुळे सिद्धार्थच्या अटकेचा व्हिडीओ पाहून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
तुम्हीही सिद्धार्थचे चाहते असाल आणि हा व्हिडीओ पाहून गोंधळला असाल तर कुठल्याही निष्कर्षाला पोहोचण्याआधी जरा थांबा... कारण हा व्हिडीओ खूप जुना आहे. व्हिडीओ सिद्धार्थचा आहे, पण 2018 चा आहे.
स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, 22 जुलै 2018 मध्ये सिद्धार्थला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्याच्यावर वेगात कार चालवण्याचा आरोप होता. याच प्रकरणात त्याला अटक झाली होती. त्याच्या कारचा वेग इतका होता की, गाडी थांबेपर्यंत त्याने तीन गाड्यांना धडक दिली होती. या घटनेत सिद्धार्थला दुखापत झाली नसली तरी इतर तीन लोक जखमी झाले होते. ‘बिग बॉस 13’च्या फिनालेआधी हाच व्हिडीओ व्हायरल होतोय. असे का तर याचे उत्तर ज्याचे त्याने शोधायचे.
सध्या बिग बॉसच्या घरात शहनाझ गिल, आरती सिंह, रश्मि देसाई, सिद्धार्थ शुक्ला, आसिम रियाज आणि पारस छाब्रा असे 6 स्पर्धक उरले आहेत. अशात बिग बॉसचा विजेता कोण ठरतो, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.