‘बिग बॉस मराठी 2’ मध्ये जबरदस्त राडा घालणारा कलाकार कोण होता तर अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) . होय, आता हाच बिचुकले ‘बिग बॉस 15’मध्ये धुमाकूळ घालताना दिसणार आहे. काल बिचुकलेने ‘बिग बॉस 15’मध्ये (Bigg Boss 15) धमाकेदार एन्ट्री घेतली आणि या बिचुकलेंना भेटून सलमान खानही अवाक् झाला. ‘बिग बॉस 15’च्या ट्विटर हँडलवरुन बिचुकलेची ओळख करुन देताना ‘अजब वाईल्ड कार्ड एन्ट्री’ अशी करुन देण्यात आली आहे. ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खान (Salman Khan) आणि आणि ‘बिग बॉस मराठी’चे होस्ट महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांची जुगलबंदी पाहायला मिळाली. अशात बिचुकलेने ‘बिग बॉस 15’च्या मंचावर एन्ट्री घेतली. स्वत: महेश मांजरेकरांनी बिचुकलेची ओळख करून दिली.
बिग बॉस मराठीच्या गेल्या सीझनमध्ये अभिजीत बिचुकलेने संपूर्ण घराचा नक्शा बदलला होता. कदाचित बिग बॉस 15 मध्येही तो हेच करेल, असे मांजरेकर म्हणाले. ‘आय अॅम अ आर्टिस्ट, आय अॅम अ रायटर, आय अॅम अ पोएट, आय अॅम अ सिंगर, आय अॅम अ कम्पोझिशन मेकर, आय वाँट टू बी अ बिकम...’ अशा शब्दांत बिचुकलेने स्वत:ची ओळख करून दिली. त्यावर मांजरेकर ‘यू वाँट टू बिकम प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया’ अशी पुस्ती जोडली आणि बिचुकले त्यावर लगेच ‘येस’ त्यावर म्हणाला. बिचुकलेचा हा ‘कॉन्फिडन्स’ पाहून अभी बोल क्या करेगा तू... असं मांजरेकर सलमानला म्हणाले. सलमानही तर नुसता अवाक् झाला. बिचुकलेकडे तो नुसता पाहत राहिला.
‘बिग बॉस मराठी 2’मध्ये बिचुकलेचा प्रवास फार मोठा नव्हता. पण जो काही होता, त्यात बिचुकलेचीच चर्चा होती. ‘बिग बॉस मराठी 2’च्या सेटवरून त्याला थेट तुरुंगात जावं लागलं होतं. सातारा कोर्टाने त्याच्याविरोधात अटक वॉरंट जारी केला होता. त्यामुळे सेटवर येऊन पोलिसांनी त्याला अटक केली होती.
अभिजित बिचुकले हा पश्चिम महाराष्ट्रात सातारा येथे राहतो. त्याने प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी आजवर अनेक स्टंट केले आहेत. स्वत:ला कवी मनाचा नेता म्हणवून घेणा-या अभिजीत बिचुकलेने आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीही त्याने प्रयत्न केले आहेत. साता-याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही त्याने कित्येकदा खुलेआम आव्हान दिलं आहे. अर्थात अनेक निवडणुका लढवल्या असल्या तरी त्याला एकदाही यश आलेलं नाही. मात्र, तरीही हार न मानता त्याचे प्रयत्न सुरूच आहेत. ‘2019 चा मुख्यमंत्री मीच ठरवणार’, असं बेधडक वक्तव्यही त्याने केलं होतं.