‘बिग बॉस 15’चा (Bigg Boss 15 ) फिनाले जसजसा जवळ येतोय, तसतसा शोमध्ये रोज नवा ड्रामा पाहायला मिळतोय. शिवाय एक एक करून अनेकांचा पत्ताही कट होतोय. काल ‘वीकेंड का वार’मध्ये डबल एलिमिनेशन झालं. उमर रियाज, निशांत भट, राजीव अदातिया, करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, अभिजीत बिचुकले व रितेश असे सगळेजण नॉमिनेट होते. यापैकी दोघांचा पत्ता कट झाला. कमी मतांमुळे राजीव अदातिया बाहेर पडला आणि पाठोपाठ राखी सावंतचा (Rakhi Sawant) पती रितेश (Ritesh) याचा घरातील प्रवासही संपुष्टात आला.
घरातून बेघर होण्यासाठी रितेशचं नाव सलमाननं जाहिर केलं आणि राखी रडू लागली. रडून रडून तिची अवस्था वाईट झाली. मुळात रितेश घरातून बाहेर जातोय, यापेक्षा घरातून बाहेर पडताच आपला नवरा पुन्हा फरार तर होणार नाही ना? ही चिंता तिला सतावत होती. लग्न केल्यानंतरही दोन वर्ष रितेश राखीपासून दूर होता. दोन वर्षांनंतर आपला पती परतला म्हणून राखी आनंदात होती. पण बिग बॉसच्या घराबाहेर गेल्यावर तो पुन्हा आपल्याला सोडून जाईल, ही भीती तिला होती.
बिग बॉसच्या घराचा मुख्य दरवाजा उघडला आणि रितेश घराबाहेर पडला. यावेळी ‘मुझे छोडकर मत जाओ, तुम भाग मत जाना, कनाडा वगैर,’ असं म्हणत राखी रडू लागली. यावर ‘अरे नहीं छोडूंगा,’ असं म्हणत रितेशने राखीला समजवण्याचा प्रयत्न केला. पण राखी मानायला तयार नव्हती. तिची अवस्था बघून अखेर खुद्द सलमानने गॅरंटी दिली. रितेश तुला सोडून कुठेही जाणार नाही, अशा शब्दांत त्याने राखीला शांत करण्याचा प्रयत्न केला.
कालच सलमानने राखीचा पती रितेशची शाळा घेतली होती. बिग बॉसच्या घरात रितेशची राखीसोबतची वाईट वागणूक पाहून सलमान जाम भडकला होता आणि त्याने रितेशला नको त्या गोष्टी सुनावल्या होत्या. शिवाय घरात वा घराबाहेर राखीसोबत पुन्हा असा वागलास तर याद राख, आम्ही सर्व तिच्या पाठीशी आहोत, अशी अप्रत्यक्ष धमकीच त्याला दिली होती.सलमाने घरातून जाता जाता सुद्धा रितेशला सुनावलं. पत्नीसोबत चुकीचं वागलास आणि म्हणून त्याला कमी वोट्स मिळाले आणि तो घराबाहेर गेला, असं सलमान म्हणाला.