दिग्दर्शक साजिद खानने ( Sajid Khan) ‘बिग बॉस 16’मध्ये (Bigg Boss 16) एन्ट्री घेतली खरी पण आता त्याला बाहेर काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ‘मीटू’च्या आरोपांमुळे साजिदचं ‘बिग बॉस 16’मधील अस्तित्व धोक्यात आलं आहे. त्याच्यावर पुन्हा एकदा रोज नवे आरोप होत आहेत. काल-परवा शर्लिन चोप्राने साजिदवर गंभीर आरोप करत एक टिष्ट्वट केलं होतं. आता ‘दीया और बाती’ फेम टेलिव्हिजन अभिनेत्री कनिष्का सोनी (Kanishka Soni) हिने साजिदवर गंभीर आरोप केला आहे.
कनिष्का सोनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने साजिदवर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केला आहे. व्हिडीओत ती म्हणते, ‘काही दिवसांपूर्वीच मी मीडियाला मुलाखत दिली होती. यात मी एका निर्माता-दिग्दर्शकावर आरोप केला होता. त्याने मला घरी बोलवून माझ्याशी लैंगिक गैरवर्तन केलं होतं. मला तुझं पोट दाखवं, असं तो मला म्हणाला होता. त्या मुलाखतीत मी त्याचं नाव घेतलं नव्हतं. पण आता मला कळतंय की, ज्यांनी माझ्यासोबत हे गैरवर्तन केलं होतं त्यापैकी एक बिग बॉसच्या घरात आहे. मी आधी त्याचं नावं घेऊ इच्छित नव्हते. त्याचं नाव घेण्याआधी मी प्रचंड घाबरलेली आहे. मला भारतात यायलाही भीती वाटते. कारण हे लोक इतके पॉवरफुल आहेत की, ते काहीही करू शकतात. मला नाव घेण्याची भीती वाटते, परंतु आज मी नाव घेणार आहे. कारण तुम्ही त्याला बिग बॉसच्या घरात जी फेम व पब्लिसिटी देत आहात, त्याच्या तो लायकीचाच नाही. त्याचं नाव साजिद खान आहे.’पुढे ती म्हणते, ‘2008 मध्ये मी दोन रिअॅलिटी शो केले होते, तेव्हा माझी साजिद खानसोबत भेट झाली होती. तेव्हा इतकी कमाई नव्हती. त्यामुळे मी सेलिब्रिटीच्या मुलाखती घ्यायचे. मी एक दिवस साजिदला मुलाखतीसाठी फोन केला. त्याने मला साजिद नाडियाडवालाव्या ऑफिसमध्ये बोलावलं. बाल्कनीत मी त्याची मुलाखत घेतली. मी अॅक्टिंगमध्ये करिअर करू इच्छिते, मला तुम्ही मदत करू शकत असाल तर बघा, असं मी त्याला म्हणाले होते. तेव्हा त्याने मला घरी बोलावलं. हिरोईन बनायचं तर रिस्क घ्यावीच लागणार, हा विचार करून मी त्याच्या घरी गेले होते. मी त्याच्या रूममध्ये गेले तेव्हा त्याने मला उभं व्हायला सांगितलं. त्याने माझी फिगर पाहिली आणि तू परफेक्ट आहेस, असं म्हणाला. मी एक सिनेमा बनवतोय आणि त्यात दीपिका पादुकोणला घेतोय, असंही त्याने सांगितलं. तुझी फिगर चांगली आहे, तू हिरोईन मटेरिअल आहेस, असं म्हणत मला तुझं पोट दाखवं,काळजी करू नकोस, मी तुला स्पर्श करणार नाही, असं तो म्हणाला. मी शॉक्ड होते. मी माझं पोट दाखवू शकत नाही, असं मी हात जोडून त्याला म्हणाले. यावर, ठीक आहे, मग मी तुला माझ्या चित्रपटात घेऊ शकत नाही, असं तो म्हणाला.’
ती म्हणते, ‘दीया और बाती करत असताना माझी पुन्हा साजिदसोबत भेट झाली. मला वाटलं तो बदलला असेल. मी त्याला पुन्हा भेटायला त्याच्या घरी गेले आणि रोल मागितला. यावर, तू खूप साधी मुलगी आहेस. मला बोल्ड मुलगी हवी, असं तो म्हणाला. मला भीती वाटतेय, हे मला मारून तर टाकणार नाहीत याची. तो माझ्याशी लग्न करू इच्छित होता. मी जे करेल, ती सुद्धा तेच करेल, अशा मुलीसोबत मला लग्न करायचं असल्याचं तो म्हणायचा. हाच साजिद आज बिग बॉसच्या घरात आहे. जो मुलींचं लैंगिक शोषण करतो, त्यांना मारहाण करतो, अशा माणसाला तुम्ही बिग बॉसच्या घरात एन्ट्री कशी देऊ शकता, मला सलमानकडून ही अपेक्षा नव्हती.’