Shiv Thakare, Bigg Boss 16: ‘बिग बॉस’चा 16 वा सीझन सध्या जबरदस्त गाजतोय. रोज नवे वाद, रोज नवे राडे असं सगळं या घरात सुरू असतं. पण अलीकडे बिग बॉसच्या घरातील वातावरण चांगलंच भावुक झालेलं दिसलं. होय, अनेकांचा आवडता स्पर्धक शिव ठाकरे यावेळी ढसाढसा रडताना दिसला.
बिग बॉस 16 मध्ये शिव ठाकरेची जोरदार चर्चा आहे. त्याला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानलं जात आहे. ‘बिग बॉस मराठी’चा दुसरा सीझन जिंकणाऱ्या शिवचा खेळ अनेकांना आवडतो आहेत. शिव अगदी शांतपणे खेळतोय. पण याचदरम्यान असं काही घडलं की शिवला अश्रू अनावर झालेत.
बिग बॉसने स्पर्धकांना मन मोकळं करण्याची संधी देत कन्फेशन रूममध्ये बोलावलं. शिवलाही कन्फेशन रूममध्ये बोलवलं गेलं. पण रूममध्ये जाण्याआधीच त्याला अश्रू अनावर झालेत. तू इतका भावुक का झालास? असा प्रश्न बिग बॉसने शिवला विचारला आणि यानंतर शिव रड रड रडला.
‘मला काही दिवसांपासून आईची खूप आठवण येत होती. कोणीतरी आपलं असावं, त्याला घट्ट मिठी मारून मी नीट खेळतोय की नाही असं विचारावं वाटत होतं. काहींना वाटतं की मी डोक्याने खेळतो . पण घरच्यांना माहीत आहे की मी नेहमी माझ्या मनाचं ऐकतो. मला त्यांच्यासमोर रडताही येत नाही. नाहीतर त्यांना मी कमजोर वाटेल. गेले काही आठवडे सलमान सर माझ्याबद्दल काहीही बोललेच नाही. त्यामुळे मी नीट खेळतोय की नाही, अशी मनात भीती होती. मी काही चुकीचं वागलो तर आई चिंतीत होईल, ती रडायला लागले, याची मला काळजी आहे,’असं म्हणत शिव रडायला लागतो.
अर्थात पुढच्याच क्षणाला बिग बॉसच्या एका प्रश्नानं शिवच्या चेहऱ्यावर हसू फुलतं. तुला कोणाची मिठी हवी आहे, वीणाची का? असा प्रश्न बिग बॉस त्याला करतात. हे ऐकू शिव रडता रडता हसतो. विणीची पण चालेल किंवा ताईची पण चालेल, असं तो म्हणतो.