‘बिग बॉस16’मध्ये (Bigg Boss 16) या आठवड्यात फुल्ल ड्रामा पाहायला मिळाला. शिव ठाकरेवर (Shiv Thakare) हात उचलल्यामुळे बिग बॉसने अर्चना गौतमला (Archana Gautam) बाहेरचा रस्ता दाखवला. अर्ध्या रात्री तिला ताबडतोब घराबाहेर काढण्यात आलं. पण अर्चनाला बाहेर काढल्यामुळे बिग बॉसचे चाहते नाराज झालेत. सोशल मीडियावर अनेक चाहते अर्चनाच्या सपोर्टमध्ये मैदानात उतरले. शिव ठाकरेने अर्चनाला उकसवलं, असं म्हणत चाहत्यांनी तिची बाजू घेतली आणि अखेर अर्चना घरात परत आली.
होय, शनिवारच्या एपिसोडमध्ये अर्चना गौतमची बिग बॉसच्या घरात रिएन्ट्री झाली. वीकेंड का वारमध्ये सलमानने (Salman Khan) आधी अर्चनाला तिची चूक समजावून सांगितली आणि नंतर शिव ठाकरेचा क्लास घेतला. ‘शिव तू अर्चनाला हिंसक वागण्यासाठी उकसवलं... तू या मर्यादेपर्यंत तिला उकसवलं की, तिने तुझा गळा धरला... मी फुटेज पाहिलं आहे आणि म्हणून मी अर्चनाला घरात परत पाठवतो आहे,’असं सलमान म्हणाला. अर्चना घरात येणार म्हटल्यावर प्रियंका चौधरी आनंदाने नावायला लागली. पण साजिद खान, टीना दत्ता, सुम्बुल, निम्रत कौर व शालीन भनोट यांना मात्र सलमानचा हा निर्णय ऐकून धक्का बसला. मी हिंसाचाराच्या विरोधात आहे, असं म्हणत साजिदने आपली नाराजी व्यक्त केली.
ही स्पर्धक झाली बाहेर...
बिग बॉसच्या शुक्रवारच्या एपिसोडमध्ये प्रियंका चौधरी घराबाहेर झाल्याचं दाखवलं गेलं होतं. कारण काय तर तिने हिंसा करणाऱ्या अर्चनाला पाठींबा दिला. पण प्रियंका घरातून बाहेर गेलेली नाही. तर गोरी नागोरी (Gori Nagori) हिचा घरातील खेळ ‘खल्लास’ झाला आहे. होय, या आठवड्यात प्रियंका, गोरी नागोरी, सुम्बुल घरातून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट होते. यापैकी गोरी नागोरी एलिमिनेट झाली आहे.