'बिग बॉस हिंदी'च्या नव्या पर्वाला गेल्या आठवड्यापासून सुरुवात झाली. 'बिग बॉस १७'मध्ये मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडेही सहभागी झाली आहे. अंकिताने पती विकी जैनसह 'बिग बॉस'च्या घरात मोठ्या दिमाखात एन्ट्री घेतली. पण, घरात जाताच पती-पत्नीत खटके उडत असल्याचं दिसत आहे. 'बिग बॉस'च्या घरातील अंकिता आणि विकीचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
'कलर्स'च्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम पेजवरुन अंकिता आणि विकीचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये अंकिता आणि विकी गार्डन एरियामध्ये बसून एकमेकांशी बोलताना दिसत आहे. "मला वाटलेलं तू माझी ताकद आहेस. पण, तू नाही आहेस," असं अंकिता विकीला म्हणत. त्यावर तो "मी दिवसभर तुझ्या मागेमागे फिरू का? मी हे नाही करू शकत. मी इथे माझं नाक कापायला आलेलो नाही", असं अंकिताला म्हणतो. याआधीही 'बिग बॉस'च्या घरात विकी आणि अंकितामध्ये काही कारणांवरुन खटके उडाल्याचं पाहायला मिळालं होतं. आता या व्हिडिओमुळे त्यांच्या नात्यात दुरावा आला आहे की काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
'पवित्रा रिश्ता' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अंकिताने चित्रपटांतही काम केलं आहे. आता 'बिग बॉस १७'मध्ये टिकून राहण्यासाठी अंकिता कोणते डावपेच खेळणार, हे पाहावं लागेल. अंकिताने २०२१मध्ये व्यावसायिक असलेल्या विकी जैनबरोबर लग्नगाठ बांधली. विकी आणि अंकिता सोशल मीडियावर एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करताना दिसतात.