छोट्या पडद्यावरील अतिशय वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय असलेला कार्यक्रम म्हणजे 'बिग बॉस'. या शोच्या नव्या पर्वाला नुकतीच सुरुवात झाली आहे. 'बिग बॉस १७'मध्ये सहभागी झालेली मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडे पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. अंकिताने पती विकी जैनसह 'बिग बॉस'च्या घरात धमाकेदार एन्ट्री घेतली होती. पहिले दोन दिवस अंकिता 'बिग बॉस'च्या घरात अतिशय शांतपणे वावरताना दिसली. पण, नुकताच तिचा आक्रमक झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
'कलर्स'च्या ऑफिशिअल सोशल मीडिया पेजवरुन 'बिग बॉस'च्या घरातील अंकिताचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 'बिग बॉस'च्या घरात अंकिताचं खानजादीबरोबर जोरदार भांडण झालं आहे. या व्हिडिओत अंकिता आक्रमक झाल्याचं दिसत आहे. खानजादीबरोबर भांडताना अंकिताची जीभ घसरल्याचंही दिसत आहे. अंकिता खानजादीला "तू मुर्ख आहेस" असं म्हणते. त्यानंतर मग खानजादीही अंकिताला मुर्ख म्हणते. त्यानंतर या दोघींमध्ये कडाक्याचं भांडण झाल्याचं पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांनी पहिल्यांदाच अंकिताला इतकं आक्रमक होताना पाहिलं आहे. त्यांच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
'बिग बॉस १७' हे पर्व पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. पहिल्याच दिवशी 'बिग बॉस'ने सदस्यांना धक्का दिला. यंदाच्या 'बिग बॉस'मध्ये एक नव्हे तर तीन घरांमध्ये सदस्यांची विभागणी केली गेली. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच 'बिग बॉस'मधील सदस्यांमध्ये खटके उडाल्याचं पाहायला मिळालं. अंकिता 'बिग बॉस'मध्ये सहभागी झाल्याने चाहत्यांची या पर्वासाठी उत्सुकता वाढली होती. आता अंकिता 'बिग बॉस'च्या घरात टिकून राहण्यासाठी कोणते डावपेच खेळते, हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.