'बिग बॉस हिंदी'च्या नव्या पर्वाला नुकतीच सुरुवात झाली आहे. यंदाच्या पर्वाच्या सुरुवातीलाच 'बिग बॉस'ने स्पर्धकांना मोठा धक्का दिला आहे. 'बिग बॉस'मध्ये यंदा एक नव्हे तर तीन घरांमध्ये सदस्यांना विभक्त करण्यात आलं आहे. यंदाच्या पर्वात वकील सना खानही सहभागी झाली आहे. शीना बोरा हत्याकांड ते आर्यन खान ड्रग्ज केस यांसारख्या प्रकरणात सना खानने वकिली केली आहे. पण, आता सना खानबद्दल मोठी माहिती समोर आली आहे.
सना खानविरोधात बार काऊसिंलमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. 'बिग बॉस'मधील सनाच्या सहभागावर आक्षेप घेण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आशुतोष दुबे यांनी सनाविरोधात बार काऊंसिलमध्ये तक्रार दाखल केली आहे. ट्वीट करत त्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. बार काऊंसिलच्या नियमांचं सनाने उल्लंघन केल्याचं आशुतोष यांचं म्हणणं आहे.
"बार काऊंसिल ऑफ इंडियाच्या नियम ४७ आणि ५२ नुसार वकील दुसरा रोजगार करू शकत नाहीत. त्याचबरोबरच प्रॅक्टिस करणारे वकील दुसऱ्या क्षेत्रात पूर्णवेळ काम करू शकत नाहीत," असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
सना खान ही एक क्रिमिनल लॉयर आहे. मुंबई उच्च न्यायालयात ती प्रॅक्टिस करते. आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणामुळे ती चर्चेत आली होती. 'बिग बॉस'च्या घरात सनाला पाहून प्रेक्षकांच्याही भुवया उंचावल्या होत्या.